वनअधिकारी दत्ता पाटील यांच्या “मन फुलपाखरू” कविता संग्रहास 'मसाप' चा पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

03 February 2025

वनअधिकारी दत्ता पाटील यांच्या “मन फुलपाखरू” कविता संग्रहास 'मसाप' चा पुरस्कार

 

दत्ता पाटील

चंदगड : सी एल वृत्तसेवा

         घाटकरवाडी (ता. आजरा) येथील कवी  दत्तात्रय जिजाबाई हरी पाटील, यांच्या “मन फुलपाखरू” या कवितासंग्रहास, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, यांच्या वतीने दिला जाणारा सन २०२४ मधील उत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी असलेला  प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे

              लोकमान्य टिळक, साहित्यसम्राट न. चिं. केळकर, न्यायमूर्ती रानडे व लोकहितवादी अशा थोर समाज सुधारकांनी, स्थापन केलेल्या महाराष्ट्रातील आद्य व अग्रगण्य साहित्य संस्थेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल, समाजाच्या विविध घटकांमधून दत्ता  पाटील यांचे कौतुक होत आहे.

         हा काव्यसंग्रह अक्षर प्रकाशन आजरा यांनी प्रकाशित केला असून, यापूर्वीही या काव्यसंग्रहास कदंब महोत्सव समिती कोल्हापूर यांच्या 'कदंब पुरस्कार २०२४' ने सन्मानित करण्यात आलेले आहे. पाटील हे शेतकरी कुटुंबातील असून, सध्या ते महाराष्ट्र राज्य वन विभागात सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथे वनपाल म्हणून कार्यरत आहेत. सावंतवाडी येथे बदली होण्यापूर्वी ते चंदगड तालुक्यात वनपाल व काही काळ इन्चार्ज वनक्षेत्रपाल (रेंजर) म्हणून कार्यरत होते. एक उत्कृष्ट वनाधिकारी म्हणून ही त्यांचा विविध ठिकाणी गौरव झाला आहे. नोकरीच्या निमित्ताने जंगलात राहून तेथील प्राणी, पक्षी, फुलपाखरे व सर्व वन्यजीव यांची बोली त्यांच्यातील कवी मनाने कवितांच्या रूपात संग्रहित केली आहे. मन फुलपाखरू या कवितासंग्रहातील विविध कवितांतून ती आपल्याला अनुभवण्यास मिळते.

   कवी दत्ता पाटील यांच्या लेखणीतून पुढील काळात उत्तमोत्तम साहित्य निर्माण होवो. साहित्य जगतातील सर्वोच्च पुरस्कारांनी त्यांचा सन्मान व्हावा यासाठी चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने व पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज चॅनल परिवारातील वाचक, प्रेक्षकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

No comments:

Post a Comment