चंदगड : सी एल वृत्तसेवा
गेली तब्बल सत्तर वर्षे महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्न रेंगाळला आहे. यामुळे बेळगाव, कारवार, निपाणी बिदर भालकी या सीमा भागातील मराठी जनता कर्नाटक राज्याच्या जुलमी दडपशाही धोरणाखाली नरक यातना भोगत आहे. गेल्या ७० वर्षांत महाराष्ट्र, कर्नाटक व केंद्रात अनेक राजकीय सत्ता आल्या व गेल्या पण सीमा भागातील निष्पाप लोकांना सीमा प्रश्न सोडवणुकीच्या आश्वासनाशिवाय काही मिळालेले नाही. सीमा भागातील जनता गेली अनेक वर्षे "रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में" असे म्हणत आंदोलने करत आहे. महाराष्ट्र राज्याच्या पाठिंबाची आशा बाळगून आहे. इतकी वर्षे सुरू असलेले हे जगातील एकमेव आंदोलन समजले जाते. गेल्या ३०-४० वर्षांत महाराष्ट्र शासनाने कर्नाटकातील मराठी बांधवांसाठी महाराष्ट्रातील शासकीय सेवांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या आहेत. हीच काय ती त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
कर्नाटकातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व जनतेची महाराष्ट्र शासन, मंत्रिमंडळ किंवा विविध अनुषंगाने अनेक कामे निघत असतात. यासाठी महाराष्ट्र शासन आपल्या मंत्रिमंडळातील एक मंत्री दोन्ही कडील दुवा म्हणून सीमा समन्वयक मंत्री म्हणून नेमते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा काही काळ या पदावर कार्यरत होते. सध्या हे पद रिक्त असल्यामुळे कर्नाटकातील मराठी नेत्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ही कुचम्बना दूर करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नागपूर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्राचार्य आनंद आपटेकर, विलास कलघटगी, रणजीत चव्हाण पाटील, रमाकांत कोंडूस्कर आदींनी भेट घेऊन बेळगाव व सीमा भागाशी जवळीक असलेल्या मंत्रिमंडळातील लोकप्रतिनिधींची निवड करण्याविषयी चर्चा करून निवेदनाद्वारे विनंती केली. शिंदे यांनी तात्काळ स्वीय सहाय्यक यांना बोलवून या प्रस्तावावर स्व हस्ताक्षरात कोल्हापूरचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, साताऱ्याचे पालकमंत्री व खनिज मंत्री शंभूराजे देसाई आणि चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील या तिघांच्या नावांची शिफारस करून या तिघांपैकी योग्य प्रतिनिधीची निवड करावी. असे सचिवालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.
जर सीमा समन्वयक मंत्री म्हणून चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांची निवड झाली तर ते इतर दोन मंत्र्यांपेक्षा या कामी सीमा भागासाठी अधिक वेळ देऊ शकतील. तसे झाले तर सीमा भागातील जनतेसाठी हा मोठा आधार ठरणार आहे. त्यामुळे सीमा समन्वयकमंत्री पदाची जबाबदारी चंदगड चे आमदार शिवाजीराव पाटील यांना मिळावी. अशी मागणी सीमा भागासह चंदगड व सीमावर्ती तालुक्यातून होत आहे.
No comments:
Post a Comment