![]() |
तिलारी घाटातील जयकर पॉइंट येथे ढासळलेल्या संरक्षक कठडा दुरुस्तीच्या कामाची पाहणी करताना आमदार शिवाजीराव पाटील आदी |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
तिलारी - दोडामार्ग घाटातील नादुरुस्त जयकर पॉईंट येथे सुरू असलेल्या संरक्षक कठडा दुरुस्तीचे काम कुठल्याही परिस्थितीत २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करा. अशा सूचना चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी केल्या. घाटातील कामाच्या ठिकाणी भेट देऊन संथ गतीने सुरू असलेल्या कामाबद्दल ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
जून २०२४ मध्ये पहिल्याच पावसात घाटातील जयकर पॉईंट या धोकादायक तीव्र उतार व वळणाजवळ संरक्षक कठडा ढासळला होता. तेव्हापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जवळपास आठ महिने घाटातील एसटी बस वाहतूक बंद आहे. परिणामी बेळगाव, कोल्हापूर, राधानगरी, गारगोटी, गडहिंग्लज, चंदगड कडून सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा राज्यातील एसटी वाहतूक ठप्प आहे. यामुळे मार्गावरील प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे. अर्ध्या ते एका तासाच्या प्रवासासाठी तब्बल चार-पाच तास प्रवास व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याचा सर्वाधिक फटका छोटे व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण, शेतमजूर व कामगारांना बसला आहे. एसटी सुरू व्हावी या मागणीसाठी गेल्या चार-पाच महिन्यात सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटना, विविध सामाजिक संघटना व चंदगड व दोडामार्ग तालुक्यातील ग्रामस्थांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालय व घाट मार्गावर ठिय्या आंदोलन, रास्ता रोको, लाक्षणिक उपोषण अशी आंदोलने झाली. तथापि एसटी सुरू झालीच नाही. २६ रोजी येणाऱ्या महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे काम २४ तारखेच्या आत पूर्ण करून २५ पासून घाटातून एसटी सुरू करावी. असा परिसरातील ग्रामस्थांचा आग्रह असला तरी एसटी मार्केट पूर्वी सुरू होईल याची शक्यता नाही.
मागील महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशानंतरही बांधकाम विभाग व एसटी अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी बस वाहतूक रखडलेलीच आहे. अखेर २ फेब्रुवारीपासून या धोकादायक ठिकाणची दुरुस्ती चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहे. तथापि ठेकेदाराकडून हे काम अतिशय संथ गतीने होत असल्याच्या तक्रारी वाढल्या. कामाची गती पाहता पूर्ततेसाठी अजून किमान महिना दीड महिना लागेल अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. या तक्रारी आमदार शिवाजीराव यांच्यापर्यंत गेल्याने त्यांनी तात्काळ घाटातील कामाच्या ठिकाणी भेट देऊन मनुष्यबळ वाढवा दिवस रात्र काम करा पण २८ तारखेच्या आत काम पूर्ण करा. अशा सक्त सूचना केल्याचे समजते. आमदार पाटील यांच्यासोबत यावेळी दोडामार्ग भाजपचे रंगनाथ गवस व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment