चंदगड : सी एल वृत्तसेवा
बँक व पतसंस्था टीम 'मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघ (रजि.) आयोजित 'पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग- २०२५' स्पर्धेची विजेती ठरली. इंडॉल क्रीडांगण (बेळगाव- वेंगुर्ला रोड, हिंडगाव फाटा नजीक ता. चंदगड) येथे उपांत्य व अंतिम थरारक सामने शनिवार व रविवार दि. २२- २३/०२/२०२५ रोजी पार पडले. अंतिम सामन्यात बँक पतसंस्था संघाने बलाढ्य चंदगड पोलीस संघावर विजय मिळवत यंदाच्या वर्षातील विजेतेपदाला गवसणी घातली. पोलीस संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. राष्ट्रीयकृत बँक व पतसंस्थेतील अधिकारी कर्मचारी यांचा समावेश असलेल्या व स्पर्धेच्या सुरुवातीस लिंबू टिंबू वाटणाऱ्या या टीमने विजेते पदापर्यंत मजल मारुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
अंतिम सामन्यात पोलीस टीमने क्षेत्ररक्षण स्वीकारले बँक टीमने निर्धारित ६ षटकात ४ गडी गमावून ५७ धावा केल्या प्रत्युत्तरात पोलीस टीम ३९ धावांपर्यंत मजल मारू शकली. संपूर्ण स्पर्धेत नाबाद राहून पोलीस टीमला अंतिम फेरीपर्यंत नेणारे पोलीस टीमचे खेळाडू स्वप्निल मिसाळ अंतीम सामन्यात लवकर बाद झाल्याने पोलीस टीम अडचणीत आली. तथापि स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिसाळ यांनाच देण्यात आला.
तत्पूर्वी पहिल्या उपांत्य सामन्यात चंदगड पोलीस टीमने एसटी महामंडळ चंदगड आगार संघाचा तर बँक पतसंस्था टीमने माध्यमिक शिक्षक संघाचा पराभव केला होता.
तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात माध्यमिक शिक्षक संघाने एसटी वर विजय मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. परिणामी यंदाच्या स्पर्धेतील बलाढ्य समजल्या जाणाऱ्या एसटी संघाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने 'एक धाव आरोग्यासाठी' हे ब्रीदवाक्य घेऊन दरवर्षी शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या जातात. प्रत्येक वर्षी २४ संघांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत यंदा तांत्रिक कारणास्तव काही संघ कमी करून १६ संघ स्पर्धेत ठेवण्यात आले होते. त्यातील 'अ' गटात पोलीस, कृषी विभाग, एसटी व आरोग्य, 'ब' गटात तहसील कार्यालय, नगरपंचायत चंदगड, सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभाग, 'क' गटात महावितरण, एलआयसी इंडिया, एचडीएफसी बँक व प्राध्यापक वॉरियर्स, तर 'ड' गटात पत्रकार संघ, बँक व पतसंस्था, माध्यमिक शिक्षक व महा-ई-सेवा केंद्र आदी १६ निवडक संघांचा सहभाग होता. स्पर्धेत सन २०२३ मध्ये महावितरण विजेता तर खेडूत स्पोर्ट्स उपविजेता ठरला होता. गतवर्षी २०२४ डाना ग्रुप (ॲटलास) विजेता तर महावितरण उपविजेता ठरला होता. प्रत्येक वर्षी विजेते उपविजेते वेगवेगळे ठरत असल्याने या स्पर्धेची रंगत वाढतच चालली आहे.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण प्रसंगी पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी अशा प्रकारची शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तालुकास्तरावर भरवण्यात येणारी अशा प्रकारची महाराष्ट्रातील एकमेव क्रिकेट स्पर्धा असून ही स्पर्धा अशीच पुढे चालू राहिली पाहिजे. यासाठी तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये व समाजातील दानशूर व्यक्तींनी आपले योगदान दिले पाहिजे. असे मनोगत व्यक्त केले. त्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या संघाला दक्ष कलेक्शन फिरता चषक, ट्रॉफी तसेच उपविजेता व इतर संघांना ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या. तर उत्कृष्ट खेळाडू स्वप्निल मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, आगार व्यवस्थापक सतीश पाटील व मान्यवर उपस्थित होते. यावेळी विशेष सहकार्याबद्दल पप्पू पेट्रोल पंप, इंडॉल कंपनीचे प्रतिनिधी आदींचा सन्मान करण्यात आला. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिकेट स्पर्धा विभाग प्रमुख संपत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केले. स्वागत उपाध्यक्ष संतोष सावंत भोसले, ज्येष्ठ पत्रकार उदय कुमार देशपांडे व अनिल धुपदाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेतन शरेगार, राहुल पाटील, उत्तम पाटील, संजय केदारी पाटील, संजय मष्णू पाटील, सागर चौगुले, नंदकिशोर गावडे आदी पत्रकारांनी परिश्रम घेतले. यावेळी पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
संपूर्ण सामन्यांच्या मध्ये पंच म्हणून संपत पाटील, दिगंबर सूर्यवंशी, अभिजीत तळगुळकर, अमोल पाटील, स्वप्निल मिसाळ, संतोष गावडे, संतोष सावंत भोसले, रमेश देसाई यांनी काम पाहिले.
बक्षीस वितरणाचा औपचारिक कार्यक्रम चंदगड तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय विभागांचे प्रमुख, मान्यवर अतिथी व सर्व संघातील खेळाडूंच्या उपस्थितीत लवकरच स्वतंत्रपणे घेणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी यावेळी दिली. पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment