पारगड येथे मंगळवारी 'सुभेदार रायबा मालुसरे' स्मारक वर्धापन दिन सोहळा, आमदार शिवाजीराव पाटील यांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

24 February 2025

पारगड येथे मंगळवारी 'सुभेदार रायबा मालुसरे' स्मारक वर्धापन दिन सोहळा, आमदार शिवाजीराव पाटील यांची उपस्थिती

 

चंदगड : सी एल वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक अजिंक्य किल्ले पारगड वर गडाचे पहिले किल्लेदार 'सुभेदार रायबा तानाजीराव मालुसरे' यांच्या स्मारकाचा प्रथम वर्धापन दिन उद्या मंगळवार दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे. 

       सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूरचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली चंदगड चे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी सावंतवाडी चे तहसीलदार श्रीधर बाजीराव पाटील, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, केदारी रेडेकर फाउंडेशन चे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, सह्याद्री प्रतिष्ठानचे संघटक प्रकाश नायर, निवृत्त नौदल अधिकारी  अशोक पाटील, चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, शिवव्याख्याता अखलाक मुजावर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील विविध सरदार घराण्यांचे वंशज यांची विशेष उपस्थित राहणार आहे.

          दि. २५ रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची गडावर पालखी मिरवणूक स्मारक स्थळापासून सुरू होईल. १० वाजता सुभेदार रायबा तानाजीराव मालुसरे यांच्या स्मारकास अभिषेक यानंतर आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते पूजन, १२ वाजता शिवव्याख्याते अखलाक मुजावर यांचे व्याख्यान व उपस्थित मान्यवरांची भाषणे. दुपारी २ वाजता कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री सरस्वती विद्यालयाच्या १९८१ इयत्ता दहावी बॅचच्या वतीने उपस्थित सर्वांना स्नेहभोजन असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूरचे दुर्ग सेवक, मालुसरे परिवार व पारगड ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment