पकडलेला दारू साठा व कारसह चंदगड चे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील व चंदगड पोलीस ठाण्याचे पथक
चंदगड : सी एल वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाचा कर चुकवण्याच्या उद्देशाने गोवा बनावटीची दारू अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाचा थरारक पाठलाग करून चंदगड पोलिसांनी सुमारे ५ लाख १२ हजार ४०० रुपयांची दारू पकडली. दारू वाहतूक करणाऱ्या इनोवा कारसह एकूण १४ लाख १२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस हवालदार सुनील माळी, तुकाराम राजीगरे, पोलीस शिपाई नितीन पाटील, आशितोष शिवूडकर, ईश्वर नावलगी अधिक कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
अज्ञात खबऱ्यामार्फत पोलिसांना गोवा राज्यातून बेळगाव कडे एका वाहनातून दारू नेत असल्याची खबर मिळाल्यानंतर चंदगड पोलिसांनी सापळा लावला रात्री साडेबाराच्या सुमारास संबंधित वाहन कानूर गावाजवळ हात दाखवून थांबवण्याचा इशारा केला तथा इनोव्हा कार तुफानी वेगाने कानूर खुर्द, नागनवाडी मार्गे अडकूर, विंझणे गावाकडे नेण्याचा प्रयत्न चालवला. यावेळी वरील पोलीस पथकाने शासकीय पोलीस वाहनातून त्यांचा थरारक पाठलाग चालवला. अज्ञात आरोपी चालकाने ताब्यातील इनोव्हा कार अखेर विंझणे गावाच्या हद्दीत रस्त्यालगत सोडून अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले. पोलिसांनी या इनोव्हा कारची तपासणी केली असता कारचे मागील बाजूस वेगवेगळ्या कंपनीच्या गोवा बनावटीच्या वरील किमतीच्या सीलबंद दारूच्या बाटल्या सापडल्या. यावेळी कारसह १४ लाख १२ हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईत सापडलेल्या इनोव्हा कारचा मालक व अज्ञात चालक या आरोपींचा शोध घेण्यासाठी चंदगड पोलीस ठाण्याचे विशेष तपास पथक स्थापन केले असून ते आरोपींच्या शोधात निघाले आहे. अज्ञात आरोपींवर चंदगड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा व मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शितल धवीले या करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस उपाधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे- पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास पाटील वरील पथकाने पार पाडली.
No comments:
Post a Comment