![]() |
माध्यमिक शिक्षक विरुद्ध महा-ई-सेवा केंद्र यांच्यातील सामन्याची नाणेफेक करताना चंदगडचे आगार व्यवस्थापक सतीश पाटील. सोबत चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघ (रजि.) आयोजित 'पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग- २०२५' क्रिकेट स्पर्धेतील सुपरएट फेरीतील संघ निश्चित झाले आहेत. दि १५ व १६/०२/२०२५ रोजी खेळवण्यात आलेल्या साखळी सामन्यांनंतर पोलीस, एसटी, महावितरण, प्राध्यापक, तहसील, माध्यमिक शिक्षक, नगरपंचायत व बँकिंग असोसिएशन या आठ संघांनी सुपर एट मध्ये आपले स्थान निश्चित केले.
शनिवारी (दि. १५) झालेल्या पहिल्या सामन्यात पीडब्ल्यूडी संघाने वन विभागावर मात केली., दुसऱ्या सामन्यात महावितरण संघाने एलआयसी इंडिया संघावर शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवला, तिसऱ्या सामन्यात तहसील कार्यालय टीमने सार्वजनिक बांधकाम विभागाचा पराभव केला, चौथ्या सामन्यात एसटी महामंडळाने आरोग्य विभागावर, पाचव्या सामन्यात तहसील कार्यालयाने वन विभाग वर तर शेवटच्या सामन्यात प्राध्यापक वॉरिअर्स संघाने एलआयसी इंडिया टीमवर विजय मिळवले. या पराभवांमुळे पीडब्ल्यूडी, एलआयसी, आरोग्य विभाग, वन विभाग या बलाढ्य संघांचे आव्हान संपुष्टात आले.
रविवारी (दि. १६) झालेल्या पहिल्या सामन्यात माध्यमिक शिक्षक संघाने महा-ई-सेवा संघावर विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात तहसील कार्यालयाने नगरपंचायत टीमचा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात माध्यमिक शिक्षक संघाने बँकिंग असोसिएशन संघाचा पराभव केला. प्राध्यापक वॉरियर्स विरुद्ध एचडीएफसी बँक यांच्यातील चौथा सामना समान धाव संख्येमुळे टाय झाल्यानंतर सुपर वोव्हर मध्ये प्राध्यापकांनी बाजी मारली. शेवटच्या सामन्यात माध्यमिक शिक्षक संघाने पत्रकार टीमचा पराभव केला या सामन्यात पत्रकार संघाची स्थिती दुसऱ्या षटकात एक वेळ ४ गडी बाद ८ अशी दयनीय असताना पत्रकार संघाचे अध्यक्ष व खेळाडू श्रीकांत पाटील यांनी किल्ला लढवत नाबाद राहून ६ षटकांत धाव संख्या ६ बाद ४३ पर्यंत नेली. या दिवशी पराभूत झालेल्या महा-ई-सेवा केंद्र, बँकिंग असोसिएशन, एचडीएफसी बँक व पत्रकार संघ यांचे आव्हान संपुष्टात आले.
दोन दिवसात झालेल्या सामन्यांना पंच म्हणून पोहेकॉ स्वप्निल मिसाळ, चंदगड आगार व्यवस्थापक सतीश पाटील, नगरपंचायतचे अमोल पाटील, पतसंस्था फेडरेशनचे रवींद्र जांभळे, कृषी विभागचे दिगंबर सूर्यवंशी, गणेश फाटक व पत्रकार क्रिकेट नियोजन प्रमुख पत्रकार संपत पाटील आदींनी काम पाहिले. सुपर एट मधील सामन्या नंतर उपांत्य व अंतिम सामने शनिवार व रविवार दि. २२ व २३ रोजी होणार असल्याचे चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment