मराठी भाषेचा अभिमान बाळगणे प्रत्येकाचे कर्तव्य - संजय साबळे, माडखोलकर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2025

मराठी भाषेचा अभिमान बाळगणे प्रत्येकाचे कर्तव्य - संजय साबळे, माडखोलकर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मराठी भाषेचे महत्त्व आणि तिच्या संवर्धनाची गरज यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी संजय साबळे सर होते. ते यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की,," मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे. तिचे जतन करणे आणि अभिमानाने वापरणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मराठी भाषा टिकविण्यासाठी तिचा व्यवहारामध्ये  जास्तीत जास्त वापर करणे आणि तिच्या जतनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे सांगून त्यांनी मराठी भाषेची जडणघडण सांगून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. 

    कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस डी गोरल होते.. प्रारंभी पाहुण्यांची ओळख व प्रास्ताविक मराठी विभागाचे डॉ. जी.वाय कांबळे यांनी करून देऊन दैनंदिन जीवनात मराठी भाषेचे महत्व असल्याचे सांगून मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेचा आढावा घेतला. 

        अध्यक्ष भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. गोरल म्हणाले की, भाषा ही प्रवाही असते, सातत्याने त्यामध्ये बदल होत असतात, मराठी व कानडी भाषेचा ऋणानुबंध फार जुना आहे, मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेमुळे आपली संस्कृती टिकून असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक जागरूकपणे वेगवेगळ्या भाषा अवगत करण्याचे आवाहन केले. प्रा ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस. डी. गावडे यांनी आभार मानले.

     या कार्यक्रमाला हिंदी विभाग प्रमुख डॉ. एस. एन. पाटील, डॉ. रंजना कमलाकर, डॉ. एस. एस. सावंत, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. बाबली गावडे, डॉ. एन. एस. मासाळ, डॉ. एन. के. पाटील, डॉ. पी. एल. भादवणकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment