चंदगड : सी एल वृत्तसेवा
छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व हे संपूर्ण जगाला वंदनीय असे आहे. रयतेचे राज्य स्वराज्य निर्माण करताना शिवरायांना असंख्य अडचणी आल्या. बलाढ्य शत्रूंनी सर्व बाजूंनी वेढले असताना देखील शिवरायांनी हिंदवी स्वराज्यासाठी जी लढत दिली त्याची कीर्ती आणि इतिहास आज जागतिक स्तरावर अभ्यासली जाते. छत्रपती शिवराय हे प्रत्येक भारतीयाचे आदर्श आहेत. भगवद्गीतेच्या कर्मयोगातून शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले असे प्रतिपादन गोव्यातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड शिवाजी देसाई यांनी केले. ते चंदगड तालुक्यातील पारगड किल्ल्यावर भगवती देवीच्या सुप्रसिद्ध माघी यात्रेनिमित्त आयोजित "छत्रपती शिवराय आणि आजचा समाज" या विषयावरील व्याख्यान देताना बोलत होते. याप्रसंगी विलास आडाव, विठ्ठल शिंदे, कान्होबा माळवे, शरद मालुसरे, धोंडीबा जांभळे, विश्वास आडाव आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲड. देसाई पुढे म्हणाले मराठ्यांचा इतिहास जागतिक कीर्तीचा आहे. परंतू तो अभ्यासायला आपल्याकडे वेळ नाही, ही आपली शोकांतिका आहे. स्वराज्य स्थापनेचे कार्य कोणतीही साधन सामुग्री नसताना त्यांनी वडील शहाजीराजे भोसले यांचे प्रोत्साहन, राजमाता जिजाऊ यांचे मार्गदर्शन आणि आपल्या विश्वासू सहकाऱ्यांच्या बळावरच तडीस नेले होते. अनेक मोहिमा आखल्या, अनेक लढाया जिंकल्या. पण हे करताना त्यांनी कधीच पंचांगातील मुहूर्त पहिला नाही. त्यामुळेच शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना आखलेली एकही योजना अपयशी ठरली नाही हे वास्तव आहे. त्यांनी स्वराज्याचे ध्येय बाळगताना प्रजेमध्ये आधी विश्वास निर्माण केला. म्हणून प्रजेला वाटले स्वराज्य म्हणजे आपलेच रयतेचे राज्य आहे. म्हणूनच सर्वसामान्य शेतकऱ्यातून अनेक लढवय्या योद्धे निर्माण झाले. जमीन मोजणीचे जनक, भारतीय लोकशाहीचे जनक हे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायच आहेत.
आज गोव्यात आम्ही नाणूस किल्ला चळवळ यशस्वी केली, ती शिवचरित्राच्या प्रेरणेतूनच. गोवा सरकारने सत्तरी तालुक्यातील ऐतिहासिक नाणूस किल्ल्यावर गोवा स्वातंत्र्यलढ्याचे क्रांतिवीर दिपाजी राणे यांना प्रत्येक २६ जानेवारीला मानवंदना देण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतलाय. आज घराघरांमध्ये छत्रपती शिवरायांच्या विचारांचे पारायण झाले पाहिजे. युवकांनी छत्रपती शिवराय समजून घेतले पाहिजे. याप्रसंगी पारगड ग्रामस्थांच्या वतीने अँड शिवाजी देसाई यांचा गौरव करण्यात आला.
No comments:
Post a Comment