मलतवाडी ग्रामस्थांमार्फत किल्ले पारगडवर शिवजयंती, गडावरील पाणीटंचाई बाबत संतप्त प्रतिक्रिया - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2025

मलतवाडी ग्रामस्थांमार्फत किल्ले पारगडवर शिवजयंती, गडावरील पाणीटंचाई बाबत संतप्त प्रतिक्रिया

शिवजयंती निमित्त पारगड वर जमलेले मलतवाडी ग्रामस्थ महिला व स्वराज्य कला क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते

चंदगड : सी एल वृत्तसेवा
       हिंदवी स्वराज्यातील अजिंक्य ठरलेल्या चंदगड तालुक्यातील किल्ले पारगड वर अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, कुळवाडी भूषण, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती मलतवाडी (ता. चंदगड) ग्रामस्थांच्या वतीने भक्ती पूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. स्वराज्य कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ व गावातील शिवप्रेमी दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून शिवजयंतीचा हा उपक्रम राबवण्यात आला.
   सुरुवातीस गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. यानंतर भवानी मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात संतोष शारबिद्रे, दीपक पाटील, अमर ओऊळकर आदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर भाषणे केली. यावेळी त्यांनी घराघरात शिवाजी जन्माला यायचे असेल तर प्रत्येक स्त्रीने प्रथम जिजाऊ बनले पाहिजे असे सांगितले. पारगड येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते व नरवीर तानाजी मालुसरे यांचे मामा इतिहास प्रसिद्ध शेलार मामांचे वंशज रघुवीर खंडोजी शेलार यांनी उपस्थितांना पारगड किल्ल्याचा इतिहास सांगितला. त्यांचा मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ व फेटा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मलतवाडी येथून आलेल्या ग्रामस्थांमध्ये ८० टक्के महिलांची उपस्थिती होती. मंदिरातील कार्यक्रमानंतर सर्वांनी छत्रपती शिवराय, संभाजी महाराज जिजाऊंच्या जयघोषात संपूर्ण किल्ल्याची भ्रमंती केली. यावेळी सर्व महिला व तरुण मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासात हरवून गेले होते. कार्यक्रमाचे संयोजन  श्रीपाद सामंत यांनी केले. मंडळाचे कार्यकर्ते अमर ओऊळकर यांनी आभार मानले.
       यावेळी स्वराज्य मंडळांने सोबत आलेल्या सर्व ग्रामस्थांसह शिवजयंती निमित्त गडावर आलेले शिवप्रेमी पर्यटक व सर्व ग्रामस्थांसाठी भोजन व्यवस्था केली होती. पिकनिकच्या नावाखाली कुठेतरी भटकण्यापेक्षा शिवजयंती निमित्त आशा दुर्लक्षित ठिकाणी जाऊन इतिहास व तेथील समस्या जाणून घेणे केव्हाही चांगले. अशा प्रतिक्रिया पर्यटकांतून व्यक्त होत होत्या. अशाच पद्धतीने मजरे करावे येथील शहीद फाउंडेशन व ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी पारगड किल्ल्यावर दोन दिवस शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असे उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे.

 पारगडच्या पाणी टंचाईपुढे शिवप्रेमीही हतबल
    पारगड किल्ल्यावर गेल्या काही वर्षात फेब्रुवारी अखेर पासूनच भीषण पाणीटंचाई असते. याबद्दलच्या बातम्या वृत्तपत्र व न्यूज चॅनेलवर झळकत असतात. हे पाहून मलतवाडी ग्रामस्थांनी या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आपल्या सोबत येताना पाण्याचा टँकरही गडावर आणला होता हे विशेष. पण असे किती दिवस चालणार? पारगड वरील पाणी प्रश्न मार्गी लागणार की नाही? असा संतप्त सवाल शिवप्रेमी नागरिकांतून व्यक्त होत होता.




यावेळी सर्वांनी गडावर भ्रमंती करून गडाचा इतिहास जाणून घेतला.

No comments:

Post a Comment