विद्यार्थ्यांनी शेअर मार्केटचा अभ्यास करून आपल्या उत्पन्नाचा मार्ग बनवावा - सचिन शेटे - चंदगड लाईव्ह न्युज

13 March 2025

विद्यार्थ्यांनी शेअर मार्केटचा अभ्यास करून आपल्या उत्पन्नाचा मार्ग बनवावा - सचिन शेटे


चंदगड / सी एल वृतसेवा

       संपत्ती निर्माण करण्याचा शेअर मार्केट एक अतिशय महत्त्वाचा स्त्रोत  आहे, यासाठी विद्यार्थ्यांनी  शेअर मार्केटचा अभ्यास करून आपल्या उत्पन्नाचा मार्ग बनवण्याचे आवाहन गडहिंग्लज येथील एस एस ट्रेडर्स चे संस्थापक सचिन शेटे यांनी केले.

 ते चंदगड येथील र.भा माडखोलकर  महाविद्यालयात, यशवंतराव चव्हाण  अग्रणी महाविद्यालय हलकर्णी अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या एकदिवशीय कार्यशाळेत साधन व्यक्ती म्हणून  बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. डी. गोरल होते. 

सचिन शेटे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, शेअर बाजारात खरेदी विक्री करण्यासाठी सर्वप्रथम डिमॅट अकाउंट काढावे लागते. मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार या प्रमुख शेअर बाजारात शेअर्स आणि डेरिव्हेटिव्हजची खरेदी विक्री करून मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण करणे शक्य होते. आयपीओ आणि इक्विटी शेअर्समध्ये अभ्यासपूर्वक खरेदी विक्री करून अनेक लोकांनी प्रचंड संपत्ती निर्माण केली आहे.यासाठी अभ्यासाची नितांत आवश्यकता आहे. याबरोबरच शेअर बाजारातील धोक्यांची माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा मिळविलेली संपत्ती अनेकांना गमवावी लागली आहे. याचीही जाणीव करून दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस ची परिपूर्ण माहिती यावेळी  शेटे यांनी करून दिली.

 दुसरे साधन व्यक्ती म्हणून  बोलताना प्रा. दुष्यंत शिंदे म्हणाले की, भारतीय शेअर बाजारातील एकूण व्यवहारांचा विचार करता मुंबई शेअर बाजारात सर्वाधिक व्यवहार होतात. शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी कोणत्या बाबींची आवश्यकता असते. स्मॉलकॅप, मिडकॅप आणि लार्जकॅप कंपन्या म्हणजे काय? शेअर बाजारातील वेगवेगळे सेक्टर याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती करून दिली. 

प्रारंभी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. एस. सावंत यांनी करून विद्यार्थी जीवनातच उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणुकीचे महत्व विद्यार्थ्यांना समजल्यास भविष्यात उत्पन्न धारक झाल्यानंतर त्यांना आपल्या संपत्तीमध्ये वाढ करणे सोईचे होईल. म्हणून अर्थशास्त्र विभाग आणि अग्रणी महाविद्यालय योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य डॉ.एस. डी. गोरल म्हणाले की, शेअर बाजारात जोखीम असली तरी उत्पन्न मिळविण्याचा एक महत्वाचा मार्ग आहे. काही दक्षता घेऊन गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळविता येईल. यासाठी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून सहभाग घेऊन  लाभ घ्यावा तसे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.

सूत्रसंचलन प्रा. ए.डी.कांबळे यांनी तर आभार प्रा. व्ही. के. गावडे यांनी मानले. या कार्यशाळेला डॉ. वृषाली हेरेकर, डॉ. टी. ए.कांबळे, डॉ. आर. ए. कमलाकर, प्रा. व्ही. के. गावडे,डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. संदीप आपके, 

 प्रा. व्ही डी पाटील,.मुन्ना पिरजादे, अनिल पाटील. यांच्या सह मोठ्यासंखेने विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment