चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील किल्ले पारगड ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले, घोटगेवाडी रस्ता काम गेल्या ६ वर्षापासून अर्धवट अवस्थेत रखडले आहे. या रस्त्यासाठी अनेक वेळा लाक्षणिक उपोषणे, धरणे, रस्ता रोको, ठिय्या, आमरण उपोषण अशी आंदोलने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी वेळोवेळी केली. प्रत्येक आंदोलनाच्या वेळी या रखडलेल्या रस्ता कामासाठी जबाबदार असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग व संबंधित प्रशासकीय अधिकारी तसेच दोन्ही तालुक्यातील लोकप्रतिनिधी केवळ वेळ मारून नेत आले आहेत. यामुळे आंदोलक व नागरिकांची फसवणूक झाल्याची भावना दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
रखडलेले हे काम २३ मार्च पर्यंत सुरू न झाल्यास २४ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय दोडामार्ग येथे उपोषण करणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. तरीही दि २५ पर्यंत सुद्धा काम सुरू करण्याच्या काही हालचाली न झाल्यास २६ तारखेला आत्मदहन करण्याचा इशारा पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर शेलार यांच्याबरोबर उपोषणासाठी बसणारे आंदोलनकर्ते ज्ञानेश्वर चिरमुरे, प्रकाश नाईक, प्रदीप नाईक, पंकज गवस, विद्याधर बाणे, प्रकाश पवार, मनोहर पवार, देविदास पवार, संतोष पवार, तुकाराम सुतार सौ सुजाता मनेरीकर यांच्या सह्या असून या आंदोलनास दोन्ही तालुक्यातील जनतेचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
रखडलेल्या या सुमारे ९ किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी सहा वर्षांपूर्वी तब्बल पाच कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. हे काम सन २०१७ ते २०२० पर्यंत असे ३ वर्षे सुरू होते. या काळात रस्ता रुंदीकरण सपाटीकरण खडीकरण तसेच मार्गावरील मोऱ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. तथापि काम रखडल्यामुळे गेल्या पाच सहा वर्षात अति पावसात रस्ता व बऱ्याच मोऱ्या वाहून गेल्या आहेत. याला बांधकाम विभागाची दिरंगाई व वनविभागाचा आडमुठेपणा तसेच ठेकेदार व लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप गेल्या तीन-चार वर्षात सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्र्यांचे इकडे लक्ष नाही तर सिंधुदुर्गचे मंत्री यांच्याकडून केवळ आश्वासने मिळाली आहेत. असे रघुवीर शेलार यांनी उद्वेगाने सांगितले. आत्ताचे आंदोलन हे आरपारचे आंदोलन ठरणार असून दोन दिवसाच्या उपोषणानंतर तिसऱ्या दिवशी थेट आत्मदहन करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. पहिला काम सुरू करा नंतर शासकीय खात्यांची प्रोसिजर करत बसा. असा निर्वाणीचा इशारा आंदोलनकर्त्यांनी निवेदनातून दिला आहे.
हा रस्ता झाल्यास चंदगड, बेळगाव, संकेश्वर, हत्तरगी परिसरातून सिंधुदुर्ग व गोव्याचे अंतर सुमारे २० किलोमीटर कमी होणार आहे.
निवेदनाच्या प्रती पालकमंत्री सिंधुदुर्ग, आमदार सावंतवाडी, आमदार चंदगड, आमदार वरळी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग व डी एफ ओ सावंतवाडी, सार्वजनिक बांधकाम उप अभियंता, तहसीलदार, पोलीस निरीक्षक व वनक्षेत्रपाल दोडामार्ग यांना दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment