राजगोळी खुर्द येथे शॉर्टसर्किटने आग; काजू व आंब्याची झाडे भस्मसात, लाखोंचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2025

राजगोळी खुर्द येथे शॉर्टसर्किटने आग; काजू व आंब्याची झाडे भस्मसात, लाखोंचे नुकसान

 

राजगोळी खुर्द येथील शेतकरी नागेश भोसले यांच्या शेतातील आंबा काजूची झाडे अशाप्रकारे आगीत जळून खाक झाली आहेत.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

         राजगोळी खुर्द (ता चंदगड) येथे नागेश हरीश भोसले यांच्या गट नंबर 149/1 मधील शेतामध्ये बुधवार दि. 5.3.2025 रोजी दुपारी 1 च्या सुमारास भीषण आग लागली. वीज वितरण कंपनीची लाईन भोसले यांच्या शेतातून गेली आहे. येथून गेलेल्या दोन खांबांमधील अंतर जास्त असल्याने खांबावरील तारा थोड्याशा वाऱ्याच्या झोतानेही एकमेकांना चिटकत होत्या. यावेळी स्पार्किंग होऊन खाली ठिणग्या पडत होत्या. यामुळेच आग लागली असे शेतकरी भोसले यांनी सांगितले. या आगीत संबंधित शेतकऱ्याच्या मालकीची काजू व आंबा अशी एकूण 21 झांडाची बाग जळून नष्ट झाली. उन्हामुळे आगीचा झपाटा जोरात होता. वाऱ्यामुळे ही आग नजीकच्या जंगलात पसरली. ही आग विझवण्यासाठी राजगोळी खुर्द चे पोलिस पाटील प्रदीप दड्डीकर, महावितरण चे कर्मचारी सागर मोटे व कल्लाप्पा कांबळे, सुभाष देसाई आदींनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा करत पुढे जंगलात गेलेली आग विजवली. यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. 

    दरम्यान आपल्या झालेल्या नुकसानीची भरपाई महावितरणने द्यावी अशी मागणी शेतकरी भोसले यांनी केली आहे. बुधवारी लागलेल्या आगीचा पंचनामा शुक्रवारी दुपारपर्यंत झाला नव्हता असे संबंधितांनी सांगितले.

No comments:

Post a Comment