![]() |
पारगड किल्ल्यावरील गणेश तलाव |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यावर "सूर्य, चंद्र असेपर्यंत गड जागता ठेवा...!" हा राजांचा आदेश शिरसावंद्य मानून पारगड वरील मावळे व त्यांचे वंशज गेली साडेतीनशे वर्षे अनेक हाल अपेष्टा सहन करत किल्ल्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहेत. तथापि स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७८ वर्षानंतरही शासनकर्त्यांचे या किल्लाचे जतन, संवर्धन, सुशोभीकरण व विकास कामांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थ, शिवप्रेमी व पर्यटकांतून होत आहे.
या संदर्भात वन हक्क समिती अध्यक्ष रघुवीर शेलार व पारगड वासीय मावळ्यांनी गड संवर्धन, सुशोभीकरण तसेच पर्यटक व गडावरील रहिवाशांच्या समस्या मांडणारे निवेदन पालकमंत्री, पर्यटन मंत्री, चंदगड व वरळी मुंबई विधानसभेचे आमदार यांना नुकतेच दिले आहे.
सन १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाची निर्मिती करून गडाचे पहिले किल्लेदार म्हणून सुभेदार तानाजीराव मालुसरे यांचे पुत्र सुभेदार रायबा यांना किल्लेदारी बहाल केली. मराठेशाहीत परकीय आक्रमण व त्यानंतर ब्रिटिश, पोर्तुगीज काळातही किल्ला अजिंक्य ठेवण्याचे कार्य गडावरील मावळ्यांनी केले. तथापि त्यांच्या वंशजांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. शिवकाळात मानधन, खंडणी लागू होती. ब्रिटिश काळात मिळणाऱ्या सनदा व मानधनही नंतर बंद झाले. यावर कहर म्हणजे १५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने हा संपूर्ण किल्लाच वन विभागाच्या ताब्यात देऊन साडेतीनशे वर्षे किल्ल्याचे जतन करणाऱ्या मावळ्यांची येथून हकालपट्टी करण्याचा घाट घातला. तथापि गडकर्यांचा न्यायालयीन लढा व राज्यातील काही चांगल्या लोकप्रतिनिधींमुळे गडकरी बेघर होण्यापासून वाचले. ७-८ वर्षांपूर्वी येथील मूळ रहिवाशांना घरे बांधण्यासाठी ठराविक जागा देण्यात आल्याने येथील रहिवाशांना थोडा दिलासा मिळाला आहे
सद्यःस्थितीत ४९ एकर क्षेत्रात पसरलेल्या गडाची तटबंदी, शिवकालीन बांधकामे, फाटक, गणेश, महादेव, गुंजल हे चार तलाव व शिवकालीन विहिरी यांचे संवर्धन, बारा बुरुजांची डागडुजी, गडावर येणाऱ्या शिवप्रेमी पर्यटकांसाठी चार ठिकाणी स्वच्छतागृह (शौचालय) व स्नानगृह बांधणे, गडावरील अंतर्गत कॉंक्रीट किंवा डांबरी रस्ते, स्मशान शेड बांधकाम, तलावांच्या परिसरात बगीच्या, रहिवाशांच्या वाढत्या पिढीसाठी प्रत्येकी तीन गुंठे ज्यादा जमीन देणे, आपत्कालीन दवाखाना सुरू करणे, पर्यटकांना गडावरुन गोवा, वेंगुर्ला, मोपा विमानतळ, कलानिधीगड, अरबी समुद्रातील सूर्यास्त पाहण्या साठी बुरुजांवर सुविधा, गड चढण्यासाठी असलेल्या शिवकालीन पायऱ्यांच्या सुरुवातीस व शेवटी शिवकाळाची अनुभूती देणाऱ्या कमानी बांधणे, छ. शिवाजी महाराज पुतळा परिसरातील राजसदर जिर्णोद्धार करणे. भवानी मंदिर समोरील ढासळलेला कठडा पूर्ण बांधकाम करणे, गुंजन तलाव परिसरात वाहनतळ बांधणे, गेस्ट हाऊसची दुरुस्ती करणे, किल्ल्यावर कायदा, सुव्यवस्था आणि स्वच्छता राखण्यासाठी वन व पोलीस विभागाचे कार्यालय बांधणे, आदी मागण्यांचे निवेदन वन हक्क संरक्षण समिती मिरवेल, पारगड, नामखोल च्या वतीने अध्यक्ष रघुवीर शेलार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. संबंधित मंत्री व आमदारांना दिले आहे.
शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन निवडून आलेले महाराष्ट्रातील सध्याचे फडणवीस सरकार गडाचे संवर्धन व सुविधां बरोबरच गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गडावर येण्यासाठीचा मोर्ले- पारगड रस्ता पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी देईल अशी अपेक्षा पर्यटकांतून व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment