दाटे येथील 'लांबचं गाव' स्मशानभूमीत लोखंडी दाहिनी व रंगरंगोटी; रयत सेवा फाउंडेशनचा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

20 March 2025

दाटे येथील 'लांबचं गाव' स्मशानभूमीत लोखंडी दाहिनी व रंगरंगोटी; रयत सेवा फाउंडेशनचा उपक्रम

दाटे स्मशानभूमीतील 'लांबच गाव' नावाच्या याच शेडमध्ये रयत सेवा फाउंडेशनच्या वतीने शवदाहीनी बसवून रंगरंगोटी करण्यात आली आहे.
चंदगड : सी एल वृत्तसेवा
   दाटे (ता. चंदगड) येथील स्मशानभूमीतील शेडमध्ये रयत सेवा फाउंडेशनच्या वतीने व घनश्याम पाऊसकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोखंडी शव दाहिनी नुकतीच बसवण्या बरोबरच स्मशान शेडची रंगरंगोटी करण्यात आली आहे. रयत सेवा फाऊंडेशनच्या समाजाभिमुख उपक्रमाबद्दल ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे.
   दाटे हे चंदगड तालुक्यातील मध्यवर्ती व मोठे गाव म्हणून गणले जाते. अनेक वर्षे येथील स्मशानभूमीतील शेडमध्ये शिवदाहीनी जाळी बसवण्यात आलेली नव्हती. यामुळे गावातील कुणाचा मृत्यू झाल्यास सरण रचणेकामी ग्रामस्थ व नातेवाईकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. ही अडचण ओळखून घनश्याम पाऊसकर व त्यांचे सहकारी तसेच रयत सेवा फाउंडेशनने स्मशानभूमीतील शेडमध्ये लोखंडी शव दाहिनी बसवण्याचा निर्णय घेतला. हे काम पूर्णत्वास नेताना स्मशान शेडला रंगरंगोटी व सुशोभीकरण करून स्मशानभूमीचे 'लांबचं गाव' असे समर्पक नामकरण करण्यात आले आहे. या उपक्रमाबद्दल रयत सेवा फाउंडेशन बाबत ग्रामस्थांत कौतुक युक्त आदरभाव निर्माण झाला असून पंचक्रोशीत हा चर्चेचा विषय ठरला आहे. हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी घनश्याम पाऊसकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश खरुजकर, धाकोबा गुरव, ज्ञानेश्वर गावडे, परशुराम देसाई, दीपक नाईक, विक्रम नाईक, मनोज खरुजकर, परसु किणेकर, मल्लाप्पा नाईक, सदाशिव नाईक आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment