![]() |
चंदगड तालूक्यातील शाळांना ग्रंथ प्रदान करताना साहित्यकार जीवन साळोखे, माजी आमदार राजेश पाटील |
तेऊरवाडी : सी एल वृत्तसेवा
सध्याच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांचा स्क्रिन टाईम वाढला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यात पुस्तक वाचनाची सवय निर्माण होणे गरजेचे आहे. पुस्तक वाचनाची चळवळ टिकवण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन साहित्यिक व ग्रंथदान चळवळीचे प्रमुख प्राचार्य जीवन साळोखे यानी केले. चंदगड तालूक्यातील हलकर्णी येथील तुलसी बाझार हॉलमध्ये तालुक्यातील ३१ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना ग्रंथदान करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेश पाटील होते.
प्राचार्य साळोखे पुढे बोलताना म्हणाले, माझा विनामूल्य पुस्तके देण्याचा हेतू शिक्षक व विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचली पाहिजेत हा आहे. पुस्तकाचा संबंध मस्तकाशी आहे. मस्तकामध्ये वेदना अन संवेदना जागृत करायचे काम पुस्तके करतात. वाचनामुळे आपले अज्ञान आपल्याला कळून आपण सज्ञान होऊ शकतो. विद्यार्थांच्या वाचनातून अभ्यासू वृत्ती वाढून व्यासंग निर्माण होईल. हा व्यासंग एक सुजाण नागरिक व समाज घडवेल यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याचे आवाहन त्याने शेवटी केले.
यावेळी बोलताना राजेश पाटील म्हणाले, नुसत्या नावापुढे पदव्या मिळवण्यासाठी वाचन नको, तर सुसंस्कृत सुजाण नागरिक बनण्यासाठी वाचन हवे. तरुणांमध्ये वाचन संस्कृती निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. हजारो शाळांना विनामूल्य ग्रंथदान करणारे प्राचार्य साळोखे यांचे कार्य अतुलनीय आहे. गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील म्हणाले, "आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी पुस्तक वाचन महत्वाचे आहे. शासनाने जरी १ कोटी पुस्तक वाचनाचे उद्दिष्ट गाठले असले तरी आपण शिक्षकांनी सदैव वाचन संस्कृती जोपासायला हवी. पुस्तकांचा खजिना विद्यार्थ्यांसमोर खुला करण्याची जबाबदारी शिक्षकांनी घ्यायला हवी. यावेळी गटविकास अधिकारी बाळासाहेब भोबे यांनीही मनोगत व्यक्त केले.
माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ग्रंथ दानाबद्दल राजेश पाटील यांच्या हस्ते जीवन साळोखे यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व शाळाना ग्रंथ तसेच ग्रंथालयाचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची व ग्रंथालय शास्त्राची पंचसूत्री प्रतिमा भेट देण्यात आली. या कार्यक्रमाला सौ. सुस्मिता राजेश पाटील व झिमाना नि. पाटील यांच्यासह चंदगड तालूक्यातीत ३१ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, ग्रंथपाल, भाषा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राताविक प्राचार्य एस. जी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आर. डी. पाटील यांनी केले. तर आभार जे एस पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment