चंदगड : सी एल वृत्तसेवा
बेळगाव शहर, सीमाभाग तसेच चंदगड तालुक्यातील कुस्ती शौकीनांसाठी बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेने मोठी मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. बुधवार दि. १२ मार्च २०२५ रोजी आनंदवाडी बेळगाव आखाड्यात भारत, अमेरिका, इराण, हरियाणा येथील एका पेक्षा एक प्रसिद्ध मल्ल एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. यावेळी आखाड्यात कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या एकूण ९१ रंगतदार कुस्त्या आयोजित करण्यात आल्याची माहिती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
मैदानात 'बेळगाव केसरी' किताबासाठी महाराष्ट्राचा पै महेंद्र गायकवाड विरुद्ध इराणचा पैलवान सोहेल यांच्यात, 'बेळगाव मल्ल सम्राट' किताबासाठी महाराष्ट्र केसरी पै सिकंदर शेख विरुद्ध पै विशाल हरियाणा, 'बेळगाव रणवीर' किताबसाठी महाराष्ट्राचा पैलवान शिवा विरुद्ध अमेरिकेचा पैलवान प्रॅडीला यांच्यात लढत होणार आहे. 'बेळगाव शौर्य' किताबासाठी इराण चा पैलवान हादी विरुद्ध महाराष्ट्राचा दादा शेळके यांच्यातील लढतीशिवाय कर्नाटकचा वाघ पै. कार्तिक काटे दावणगेरी विरुद्ध पै. मिलाद इराण यांच्या आकर्षक लढत होणार आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही चटकदार नेपाळी मल्ल देवा थापा हा आखाड्याचे आकर्षण ठरणार आहे. याशिवाय यंदाच्या मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे आनंदवाडीच्या आखाड्यात प्रथमच महिला कुस्त्या आयोजित करण्यात आल्या असून यावेळी कर्नाटक चॅम्पियन स्वाती पाटील (कडोली) विरुद्ध हरियाणा चॅम्पियन हिमानी यांच्यासह अन्य लढती होणार आहेत.
बेळगावच्या आनंदवाडी आखाड्याला शेकडो वर्षांची मोठी परंपरा असून याच मैदानात दिल्लीचा अजिंक्य पै सतपाल विरुद्ध महाराष्ट्राचा हरिश्चंद्र बिराजदार यांच्यातील जगप्रसिद्ध कुस्ती झाली होती. सन १९७८ मध्ये झालेल्या या कुस्तीत महाबली सतपाल याला तत्कालीन महाराष्ट्र केसरी हरिश्चंद्र बिराजदार यांनी तेराव्या मिनिटात चित्रपट करून कुस्ती जगताचे लक्ष वेधून घेतले होते. याशिवाय महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर विरुद्ध पंजाब केसरी कर्तारसिंग यांच्यातील बहुचर्चित कुस्तीत कर्तारसिंग विजयी झाले होते.
No comments:
Post a Comment