चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने आयोजित 'साहित्यानंद' या विशेष सोहळ्याने साहित्य, कला आणि मनोरंजनाचा अद्वितीय संगम घडवला. हाजगोळी येथील देव चाळोबा या निसर्ग रम्य परिसरात हा सोहळा रंगला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीमाकवी रवींद्र पाटील (राज्याध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कर्नाटक) होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मायाप्पा पाटील आणि मुख्याध्यापक आप्पाराव पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात तानाजी पाटील यांच्या जोशपूर्ण 'गर्जा महाराष्ट्र माझा'या गीतांनी झाली. एम. एन. शिवणगेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या नूतन कार्यकारिणी अध्यक्ष मोहन पाटील, उपाध्यक्ष कमलेश कर्णिक, कार्याध्यक्ष राघवेंद्र इनामदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यापक संघाच्या नवोपक्रमशील आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये संजय साबळे, एम. एन. शिवणगेकर, सीमाकवी रवींद्र पाटील, बी. एन. पाटील, प्रताप नागेनट्टी व वैशाली कर्णिक मॅडम यांचा सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे प्रा. मायाप्पा पाटील यांनी संघाच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले, "मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रसारासाठी शिक्षकांनी योगदान द्यावे. नवोपक्रमशील शिक्षकच शिक्षण व्यवस्थेला नवे आयाम देऊ शकतात."
अध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी आपल्या भाषणात साहित्य आणि अध्यापन यातील नाते उलगडले. ते म्हणाले, "साहित्य माणसाला संवेदनशील बनवते, विचारप्रवृत्त करते आणि जीवन जगण्याची कला शिकवते. शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून समाज प्रबोधनाचा दीपस्तंभ आहे."
साहित्यानंद सीमाकवी रवींद्र पाटील, संजय साबळे आणि बी. एन. पाटील यांनी आपल्या प्रभावी रचना सादर केल्या. महादेव शिवणेकर यांनी पारंपरिक गोष्टींनी आणि विनोदाने हास्यकल्लोळ उडवला. मोहन पाटील, आप्पा राव पाटील, अश्विनी पाटील, ऋतूजा शिवणगेकर यांची मनोगते झाली. कराओके संगीतावर कु.शार्दुल साबळे, तानाजी पाटील, विद्या पाटील ,रवींद्र पाटील , रोहिणी पाटील आणि संजय साबळे यांनी भावगीत, भक्तिगीत आणि लोकसंगीत सादर केले.
यावेळी बाबुराव पाटील काव्यसंग्रह व हर्षवर्धन कोळसेकर यांनी संपादित केलेला ' शब्दकुसूम ' दिवाळी अंक अध्यापकांना भेट दिली. महिलांसाठी 'होम मिनिस्टर' अंतर्गत खेळांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये संध्या संजय साबळे, ऋतुजा राजेंद्र शिवणगेकर आणि अश्विनी आप्पाराव पाटील यांनी बक्षिसे मिळवली. कार्यक्रमाला यावेळी कमलेश कमलाकर,भावकाणा पाटील, व्ही. एल. सुतार, प्रताप नागेनट्टी, आनंद पाटील, हर्षवर्धन कोळसेकर आणि महिला वर्ग उपस्थित होता.
साहित्य, कला आणि संस्कृतीच्या मिलाफाने भारावलेल्या या 'साहित्यानंद' सोहळ्याचे सुत्रसंचालन एच. आर. पाऊसकर तर आभार एस. पी. पाटील आभार मानले. हा कार्यक्रम चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या साहित्यप्रेमाची साक्ष देणारा ठरला. उपस्थित शिक्षक, साहित्यिक आणि कुटुंबीयांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला आणि पुढील उपक्रमांसाठी प्रेरणा घेतली.
No comments:
Post a Comment