![]() |
सोंगातील एक क्षण |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
होळी धुलीवंदन पासून पंधरा दिवस चालणाऱ्या चंदगड (जिल्हा कोल्हापूर) सिमगोत्सवातील सोंगे आता जागतिक पाटलावर पोहोचली आहेत. या अनोख्या सोंगांना आता स्पर्धेचे रूप प्राप्त झाले आहे.
यावर्षीची सोंगे अधिक उठावदार होण्यासाठी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील अनुक्रमे पाच विजेत्यांना रोख बक्षीस व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यंदा झालेल्या स्पर्धेत चंदगड शहरातील विविध गल्लीतील मंडळांनी आपल्या गल्लीतील मंडळांच्या संघांचे प्रदर्शन दि. २८ मार्च २०२५ रोजी केले. या स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण रविवार दि.३०/०३/२०२५ रोजी गुढीपाडवा व हिंदू नव वर्षाच्या मुहूर्तावर श्री देव रवळनाथ मंदिर चंदगड येथे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यंदाच्या स्पर्धेत स्पर्धेतील विजेते अनुक्रमे पुढीलप्रमाणे- १) कुंभार गल्ली, चंदगड, २) रवळनाथ गल्ली, चंदगड, ३) ब्राम्हण गल्ली, चंदगड, ४) साईमंडळ गांधीनगर, चंदगड, ५) इलगे गल्ली, चंदगड सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी भास्करजी कामत, गुंडुकाका गुळामकर, सुनील सोमण महाराज, सचिन नेसरीकर, संदीप कोकरेकर, शांताराम भिंगुर्डे, हणमंत कुंभार, पांडुरंग काणेकर, सुरेश सातवणेकर, परशराम गावडे, शिवकुमार वाली आदींचे विविध मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्र संचालन ॲड. विजय कडूकर यांनी केले. आमदार शिवाजीराव पाटील यांनी सर्व विजयी संघाचे अभिनंदन केले.
यंदा २८ मार्च या दिवशी जागर होता. सोंगाची मिरवणूक पाहण्यासाठी चंदगड शहर गजबजून गेले होते. यावेळी चंदगड, आजरा, गडहिंग्लज, बेळगाव तालुक्यांसह सिंधुदुर्ग व गोव्यातील हजारो पर्यटक व भाविकांनी सोंगांच्या खेळाचा आनंद लुटला. पारंपरिक रामायण महाभारत कथानकातील पात्रे तसेच आधुनिक वैज्ञानिक युगातील पात्रांची सोंग रंगवण्यात आली होती. यंदा नुकत्याच झालेल्या प्रयागराज येथील कुंभमेळ्याचा मोठा प्रभाव सोंगातून दिसून आला. यावेळी मोठ्या प्रमाणात साधूंची सोंगे घेतलेले तरुण सोंगामध्ये दिसत होते.
No comments:
Post a Comment