महाराष्ट्र चॅम्पियन पै. कालीचरण कडून सेनादलाचा पै. सुशांत पराभूत...! निट्टूर कुस्ती मैदानाचे थेट प्रक्षेपण 'सी एल न्यूज चॅनल' वर हजारो प्रेक्षकांनी घरबसल्या पाहिले - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2025

महाराष्ट्र चॅम्पियन पै. कालीचरण कडून सेनादलाचा पै. सुशांत पराभूत...! निट्टूर कुस्ती मैदानाचे थेट प्रक्षेपण 'सी एल न्यूज चॅनल' वर हजारो प्रेक्षकांनी घरबसल्या पाहिले

  


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

    गुढीपाडव्यानिमित्त बलभीम तालीम मंडळ व ग्रामस्थ निट्टूर (ता. चंदगड) यांच्यावतीने आयोजित निकाली कुस्त्यांच्या मैदानात सुमारे ८० चटकदार कुस्त्यांनी उपस्थित हजारो कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी झालेल्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन पै कालीचरण सोलनकर याने सेनादलाच्या ऑल इंडिया चॅम्पियन पै. सुशांत तांबुळकर याला एक चाक डावावर पंधराव्या मिनिटाला चितपट केले. तर क्रमांक दोनच्या कुस्तीत कालीचरणचा सख्खा भाऊ महाराष्ट्र चॅम्पियन पै विश्वचरण सोलनकर याने महाराष्ट्र चॅम्पियन ऋषिकेश पाटील (बानगे) याला गुणावर पराभूत केले. प्रथम क्रमांक ची कुस्ती माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. तर दोन दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती आमदार शिवाजीराव पाटील, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्ती मैदानाचे 'लाईव्ह प्रक्षेपण' चंदगड मतदारसंघाचे मुखपत्र चंदगड पत्रकार संघ संचलित 'सी एल न्यूज' वर हजारो प्रेक्षकांनी मोबाईलवर पाहण्याचा आनंद लुटला. चंदगड तालुक्यासह पुणे, मुंबई व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच देश-विदेशातून हे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या प्रेक्षक व कुस्ती शौकिनांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

    शंभर वर्षांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा असलेल्या मैदानाचे पूजन महाराष्ट्र चॅम्पियन पै. विजय पाटील (रेल्वे) व पुंडलिक रामू पाटील यांच्या हस्ते झाले. क्रमांक तीन च्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन पै विक्रम शिनोळी याने महाराष्ट्र चॅम्पियन पै आप्पा मुलतानी, (कर्नाटक चॅम्पियन) याला गदेलोट डावावर पराभूत केले. क्रमांक चार च्या कुस्तीत पै सुनील करवते कवठेपिरान याच्यावर पै प्रेम पाटील कंग्राळी याने ढाक डावावर प्रेक्षणीय विजय मिळवला. क्रमांक पाच च्या कुस्तीत पै ओमकार पाटील (राशिवडे) याने पै ऋषिकेश भिलवडे (कवठेपिरान) याला घिस्सा डावावर पराभूत केले. याशिवाय पै. प्रथमेश पाटील कंग्राळी विजयी विरुद्ध पै. रोहित चव्हाण कवठेपिरान, पै. निशांत पाटील मोतीबाग विजयी विरुद्ध पै गौस (दर्गा बेळगाव), राजू डागेकर (शिनोळी) विजयी विरुद्ध अतुल मगदूम मोतीबाग, निखिल पाटील निट्टूर विरुद्ध वैभव शिंदे कोल्हापूर आदी कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. याशिवाय विशेष आकर्षक कुस्त्यांमध्ये पार्थ पाटील कंग्राळी (कर्नाटक कुमार केसरी) याने निलेश हिरगुडे (बाणगे), आकाश पुजारी (निट्टूर) याने श्रीनंद निलजी वर तर अविनाश पाटील (निट्टूर) याने श्रेयस राऊत (दाटे) यांच्यावर प्रेक्षणीय विजय मिळवले. 

    यावेळी निट्टूर गावातील उदयोन्मुख पैलवान साहिल नेसरकर, मुबारक मुल्ला, कल्पेश पाटील, तुषार हडलगेकर, ओमकार सुतार, सुरज कांबळे, श्रीजीत पाटील, आरव बाबू पाटील, नैतिक पाटील यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली. भीमा कुरबुर अनगोळ- बेळगाव यांच्या वतीने दरवर्षी लावण्यात येणाऱ्या जंगी मेंढ्याची कुस्ती यंदा निखिल पाटील (निट्टूर) याने कोल्हापूरच्या वैभव शिंदे याला पराभूत करून जिंकली.

    प्रथम क्रमांक विजेत्या पै. कालीचरण याला माजी कुस्तीगीर पोटूअण्णा पाटील यांच्या वतीने ठेवलेली चांदीची गदा बक्षीस देण्यात आली.  यावेळी उपस्थित चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी कुस्ती मैदानासाठी ५१ हजार रुपयांची रोख देणगी देऊन यापुढे या मैदानासाठी सहकार्य करण्याचे घोषित केले.

      यावेळी चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, विक्रम चव्हाण- पाटील, गुलाब पाटील, कृष्णा यल्लाप्पा कांबळे, शंकर आंबेवडकर, शंकर मनवाडकर, दयानंद मोटूरे, प्रो कबड्डीचा स्टार खेळाडू ओमकार पाटील,  आदी मान्यवर उपस्थित होते. पंच म्हणून भैरू पाटील, गावडू पाटील, विजय पाटील, प्रकाश दळवी, मारुती खंदाळे, लक्ष्मण भिंगुडे, लक्ष्मण पवार आदींनी काम पाहिले. कृष्णात चौगुले (राशिवडे) यांनी धावते समालोचन केले. वाय व्ही कांबळे, के के पाटील, प्रा सचिन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मैदानाच्या यशस्वीतेसाठी यल्लाप्पा चांगोजी पाटील, दत्ता पाटील, भारत खवणेवाडकर, बाळू जाधव, नेत्रपाल हडलगेकर, महादेव जो. पाटील, मधुकर नाईक, गणपती नाईक, यशवंत पाटील, सुहास पाटील आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment