चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड व दोडामार्ग तालुक्यातील तिलारी घाटातील रस्ता नादुरुस्त झाल्याच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी घाटातील सर्व प्रकारची वाहतूक १ जुलै २०२४ पासून आदेश काढून बंद केली होती. या वाहतूक बंदीचा सर्वाधिक फटका या मार्गावरील एसटी व एसटी प्रवाशांना बसत होता.
दरम्यान चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून घाटातील नादुरुस्त रस्ता फेब्रुवारी महिन्यात दुरुस्त करण्यात आला होता. तरीही एक महिना वारंवार मागणी करूनही एसटी वाहतूक बंदच होती. अखेर आज १ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूरचे विभाग नियंत्रक यांनी खास पत्र काढून मार्गावरील एसटी वाहतूक सुरू करावी अशा सूचना चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी, कागल, कोल्हापूर या आगारप्रमुखांना केल्या आहेत. त्यामुळे गेले तब्बल नऊ महिने बंद असलेली घाटातील एसटी वाहतूक उद्यापासून सुरू होणार आहे.
या मार्गावर कोल्हापूर, कागल, गडहिंग्लज, राधानगरी, चंदगड व बेळगाव येथून एसटी महामंडळाच्या बस दोडामार्ग, पणजी गोवा राज्यात धावत असतात. रोज हजारो प्रवासी याचा लाभ घेतात. तथापि नऊ महिने एसटी वाहतूक बंद असल्याने एसटी महामंडळाचे लाखो रुपयांचे उत्पन्न यामुळे बुडाले.
ऑक्टोबर महिन्यापासून येथील वाहतूक सुरू करावी यासाठी मार्गावरील विविध गावच्या ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकार्यालय कोल्हापूर येथे ठिय्या, धरणे, लाक्षणिक उपोषण, घाटात रास्ता रोको अशी आंदोलने करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग व एसटी प्रशासनाने दाद दिली नव्हती. अखेर तब्बल नऊ महिन्यानंतर एसटी महामंडळ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच २ एप्रिल पासून घाटातून लाल परी धावताना दिसेल.
याबाबत बोलताना चंदगडचे आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांनी या वृत्ताला दिजोर देऊन चंदगड आगाराची पहिली बस दुपारी दीड वाजता चंदगड मधून सुटणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली. एकंदरीत रस्ता दुरुस्तीनंतर सुरू होणाऱ्या या बस सेवेमुळे प्रवाशातून समाधान व्यक्त होत आहे. इतर आगारांच्या बस गाड्याही उद्यापासूनच सुरू होतील असे संकेत मिळाले आहेत.
No comments:
Post a Comment