'जिजाऊ रथयात्रा' उद्या (दि.२१) कोल्हापूरात, मराठा सेवा संघाच्या 'समाज जोडो' अभियानांतर्गत वेरूळ ते पुणे प्रवास - चंदगड लाईव्ह न्युज

20 March 2025

'जिजाऊ रथयात्रा' उद्या (दि.२१) कोल्हापूरात, मराठा सेवा संघाच्या 'समाज जोडो' अभियानांतर्गत वेरूळ ते पुणे प्रवास

 


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

       'भोसले गढी- वेरूळ' ते 'लाल महाल- पुणे' समाज जोडो अभियानांतर्गत निघालेल्या जिजाऊ रथयात्रेचे आगमन उद्या शुक्रवार दि. २१/०३/२०२५ रोजी कोल्हापुर शहरात होणार आहे. या अभूतपूर्व रथयात्रेचे स्वागत करण्यासाठी समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडसह ३३ कक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.

       मराठा सेवा संघाच्या वतीने दि. १८ मार्चपासून सुरू झालेली ही रथयात्रा १ मे पर्यंत सुरू राहणार आहे. रथयात्रेचे उद्या कोल्हापुरात आगमन होणार असून रथयात्रेच्या स्वागतासाठी कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे सातारा व कोल्हापूर जिल्हा विभागीय अध्यक्ष इंजिनियर अश्विनकुमार वागळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष महिपती बाबर, राज्य संघटक शिवाजीराव काटकर यांनी कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

     रथयात्रा २१ रोजी दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत कोल्हापूर शहर परिसरात असणार आहे. रथयात्रेचा मार्ग पुढील प्रमाणे भगवा चौक कसबा बावडा, कावळा नाका, सायबर चौक, राजारामपुरी, जनता बाजार चौक, बागल चौक, उमा टॉकीज चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जाऊन दसरा चौक येथे रथयात्रेचा समारोप होईल. यावे

     मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, छावा मराठा संघटनेचे संस्थापक किशोर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा सीमा बोके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

     रथयात्रा मार्ग तसेच दसरा चौक येथील समारोप प्रसंगी कोल्हापूर जिल्हा व परिसरातील नागरिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पाटील, महानगर अध्यक्ष राहुल इंगवले, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष निलेश चव्हाण, शिवशाहीर दिलीप सावंत आदींनी केले आहे.

      ही रथयात्रा दि. २२ रोजी कोल्हापूर येथून पुढे रवाना होईल ती उचगाव, गडमुडशिंगी, वसगडे, पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, रांगोळी, शिरदवाड, लाट, हेरवाड, कुरुंदवाड, नरसोबावाडी, शिरोळ मार्गे जाऊन जयसिंगपूर येथे विश्रांतीसाठी थांबणार आहे.

No comments:

Post a Comment