राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत जिल्ह्याचा २२ वर्षानंतर डंका, चंदगडच्या ओमकार पाटीलचा उत्कृष्ट खेळ - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2025

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत जिल्ह्याचा २२ वर्षानंतर डंका, चंदगडच्या ओमकार पाटीलचा उत्कृष्ट खेळ


कोल्हापूर : सी एल वृत्तसेवा

        महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन च्या वतीने ठाणे येथे पार पडलेल्या ७२ व्या वरिष्ठ (प्रौढ) गट पुरुष राज्य अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने २२ वर्षानंतर पुन्हा अजिंक्यपद पटकावले. यापूर्वी सन २००३ मध्ये कोल्हापूर जिल्ह्याने अजिंक्यपद पटकावले होते. या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून  ३२ जिल्ह्यांच्या संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा बुधवार दि. १९ ते रविवार २३ मार्च २०२५ दरम्यान जेजे केमिकल कंपनीच्या ठाणे येथील क्रीडांगणावर पार पडल्या.
  अंतिम सामन्यात कोल्हापूर संघाने अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा संघाचा ४२ विरुद्ध ३२ अशा गुणांच्या फरकाने पराभव केला. उपांत्य सामन्यात पुणे ग्रामीण संघाला एकतर्फी हरवून कोल्हापूर संघाने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या आक्रमक व बचावासमोर अहिल्यानगर जिल्ह्याचा निभाव लागला नाही.
    विजेत्या संघातून दादासो पुजारी (कर्णधार), साहिल पाटील, ओमकार पाटील, साईप्रसाद पाटील, आदित्य पवार, अवधूत पाटोळे, सर्वेश करवते, सौरभ इंगळे, अविनाश चारफळे, सौरभ पगारे, धनंजय भोसले, तुषार पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. संघाचे प्रशिक्षक म्हणून शहाजहान शेख तर व्यवस्थापक म्हणून प्रा. संदीप लवटे यांनी काम पाहिले. खेळाडूंना प्रा. संभाजी पाटील, डॉ. रमेश भेंडीगिरी, प्रा. आण्णासो गावडे आदींचे मार्गदर्शन लाभले.

  कोल्हापूर जिल्ह्याच्या संघातून खेळताना चंदगड तालुक्याचा उदयोन्मुख प्रो कबड्डीचा स्टार खेळाडू ओमकार नारायण पाटील (सरोळी ता. चंदगड) याने अजिंक्यपद पटकावण्यात उत्कृष्ट योगदान दिल्याने चंदगड तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment