डॉ. आर. एन. साळुंखे व कुटुंबीय सन्मान स्वीकारताना. व्यासपीठावर मान्यवर.
चंदगड / सी एल वृत्तसेवा
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. आर. एन. साळुंखे यांना नुकताच त्यांच्या नोकरी व्यवस्थापन व नियुक्ती संदर्भातील कार्याचा गौरव म्हणून सन्मानित करण्यात आले. वेदिका कन्सल्टन्सी अँड सर्विसेस कोल्हापूर या संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सांगली, सातारा, कोल्हापूर, चंदगड व आजरा विभागातील नोकरी विषयी मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञ नोकरी व्यवस्थापक व प्रशिक्षक यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
डॉ. साळुंखे यांनी आजवर विविध प्रकारच्या कंपन्या, बँका तसेच नोकरीच्या संधी देणाऱ्या अनेक संस्थांना महाविद्यालयात कार्यक्रमासाठी बोलावून घेतले. गरजू व प्रामाणिक, कष्टाळू विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना या कार्यक्रमात उत्कृष्ट प्लेसमेंट ऑफिसर या सन्मानाने गौरविण्यात आले. या सत्काराचे स्वरूप शाल, फेटा व सन्मानपत्र असे होते. डॉ. साळुंखे यांनी केलेल्या या कार्याची पोचपावती मिळाल्यामुळे महाविद्यालयाने त्यांचे विशेष अभिनंदन केले. त्याचप्रमाणे डॉ. साळुंखे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल परिसरातून सर्वत्र कौतुकाची भावना व्यक्त होत आहे.
महाविद्यालयाच्या प्लेसमेंट अँड करिअर गाईडन्स सेलचे समन्वयक म्हणून गेली अनेक वर्षे ते कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे महाविद्यालयात आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करून अनेक विद्यार्थ्यांची नियुक्ती करून त्यांना रोजगाराची संधी मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असून अनेक विद्यार्थी या संधीचा योग्य तो लाभ घेत आहेत. भविष्यात त्यांच्याकडून अशीच कामगिरी घडावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment