कामेवाडी, चिंचणे परिसरात तिन दिवसांपासून टस्कर हत्तीचा धुमाकूळ, शेतकरी भयभीत - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2025

कामेवाडी, चिंचणे परिसरात तिन दिवसांपासून टस्कर हत्तीचा धुमाकूळ, शेतकरी भयभीत

कामेवाडी शिवारात रखवाली साठी बांधलेले मचाण, पीव्हीसी पाईपलाईनचे हत्तीने मोठे नुकसान केले आहे. ते दाखवताना शेतकरी
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
   कामेवाडी (ता. चंदगड) गावाच्या परिसरात गेल्या ३ दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या टस्कर हत्तीने आपला मोर्चा काल चिंचणे हद्दीत वळवल्याचे दिसत आहे. या हत्तीने गेल्या दोनतीन दिवसात कामेवाडी शिवारातील  ऊस पीक व काजू झाडांसह शेतीच्या रखवाली साठी बांधलेल्या झोपड्या व मचाण विस्कटून मोठे नुकसान केले होते. हा हत्ती कामेवाडी येथून राजगोळीच्या दिशेने जाईल असा शेतकऱ्यांनी बांधलेला अंदाज खोटा ठरवला.  ताम्रपर्णी नदी ओलांडून पलीकडे न जाता तो कामेवाडी व चिंचणे परिसरात खाण्यापिण्याची कुठलीच कमतरता नसल्याने इथेच फिरताना दिसत आहे. दरम्यान काल या हत्तीला काही ग्रामस्थांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. टस्करला घाबरून शेतकरी शेतात जाणे टाळत असल्याने सायंकाळ पासून ऊस व अन्य पिकात गव्यांच्या कळपांचा मुक्त संचार सुरू आहे. यामुळे येथील शेतकरी हत्ती आणि गवे यांच्या दुहेरी संकटात अडकले आहेत.
   दि २९ व ३० रोजी गावातील काटे व चुरमंदी नावाच्या शिवारात असलेल्या बसवाणी शिरगे, यांच्या शेतातील झोपडी, पीव्हीसी पाईपलाईनचे कोक व पाईप तुडवून फोडून टाकण्याबरोबरच पिकाचे रक्षण करण्यासाठी बांधलेल्या झोपड्या व मचाण सोंडेच्या फटक्यासरशी विस्कटून टाकले आहेत. त्याचबरोबर चुडामणी पाटील आदींच्या उस पीक, झोपड्या व त्यातील स्वयंपाकाची भांडी, पाण्याच्या टाक्या, प्लास्टिक बॅरेल असे साहित्य फोडून नुकसान केले आहे. या हत्तीच्या भीतीमुळे शेतातील पिकांच्या रखवाली साठी रात्री जाणारे शेतकरी घाबरून तिकडे फिरकत नसल्याने गव्यांच्या कळपांना चरण्यासाठी रान मोकळे झाले आहे. यामुळे परिसरातील शेतकरी हत्ती व गव्यांच्या दुहेरी कचाट्यात सापडले आहेत. या परिसराची पाहणी करून वन विभागाने हत्ती, गवे आदी वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान रात्रीच्या वेळी कोवाड, दुंडगे, चिंचणे, कामेवाडी ते दड्डी जाणाऱ्या प्रवासी व वाहनधारकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment