![]() |
विचार व्यक्त करताना शरदभाऊ लाड, मंचावर डॉ. पी. आर. पाटील, प्रा. आर. पी. पाटील, अन्ड प्रा. एन. एस. पाटील, एल. डी. कांबळे, डॉ. एस. डी. गोरल ई. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
बदलत्या गतिमान युगात विद्यार्थ्यांनी नव तंत्रज्ञान आत्मसात करून "टेक्नोसावी अथवा टेक्नोप्रेन्यूअर" बनावे.: असे विचार क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुंडलचे चेअरमन माननीय शरद भाऊ लाड यांनी व्यक्त केले. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात संगणक संच प्रदान सोहळा कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांच्या हस्ते विधान परिषद आमदार अरुण अण्णा लाड यांच्या आमदार फंडातून ५ लाख रुपये निधीतून दिलेल्या संगणक संच प्रदान सोहळा संपन्न झाला.
चेअरमन शरद भाऊ लाड पुढे म्हणाले की, ``आजची महाविद्यालयीन तरुण पिढी मोबाईल वरील रिल्स पाहण्याच्या नादात गुंग झाली आहे. सोशल मीडियामध्ये गुरफटली आहे. यातून तरुणांनी तात्काळ बाहेर पडणे गरजेचे आहे. जगात फार मोठी गळेकापू स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत मराठी तरुणांनी आपली क्षमता पणाला लावून, यशस्वी झाले पाहिजे. यासाठी सातत्याने वाचन, मनन, चिंतन, निरिक्षण, परिक्षण करून स्पर्धा परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. त्याकरिता कुंडल येथील क्रांती अग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्या मार्फत स्पर्धा परीक्षा केंद्र कुंडल आणि पुणे येथे चालू करण्यात आले आहे. होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
आपण ज्या आई-वडिलांच्या पोटी जन्म घेतला त्यांचे कष्ट व तळमळ आणि गुरुजनांचे संस्कार हीच आपली खरी शिदोरी आहे, त्यामुळे आपण ज्या मातीत जन्मलो त्याच मातीची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान आत्मसात करून सक्षम बनावे असेही त्यांनी सांगितले. खेडूत शिक्षण मंडळाची पुरोगामी विचारधारा आणि तत्वनिष्ठ लढवय्या जी. डी. बापू लाड यांचे विचार हे एकच असल्यामुळे मला या विचारानेच खेडूत शिक्षण मंडळाकडे आकर्षित केले आहे. आपल्याला पुरोगामी विचार रुजवायचा आहे. पुढील पिढीला विज्ञान तंत्रज्ञानात सक्षम करावयाचे आहे. ही गरज ओळखूनच विधान परिषद आमदार अरुण अण्णा लाड यांनी महाविद्यालयास आपल्या आमदार फंडातून ५ लाख रुपयाचे संगणक संच मंजूर केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. एस. डी. गोरल हे होते. ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आपले महाविद्यालय हे विद्यार्थी केद्रीत असून ज्ञान व कौशल्य केद्रीत युवक घडविण्याचा सतत प्रयत्न करत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी थोरांचा आदर्श घेण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सेनानींचा गौरवशाली इतिहास वाचून त्यातून आदर्श घ्यावा, सृजनशील व्यक्ती बनवून सुसंस्कृत समाज घडवण्यात योगदान द्यावे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमांमध्ये मनोगत व्यक्त करताना संस्थेचे संचालक प्रा. आर. पी. पाटील म्हणाले की ``खेडूत शिक्षण संस्थेचा गौरवशाली इतिहास पुरोगामी विचाराचा वसा आणि वारसा आणि स्वातंत्र्य सेनानी क्रांती अग्रणी जीडी बापू लाड यांचे विचार एकच होते. क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड हे भूमिगत असताना चंदगड तालुक्यामध्ये संस्थेचे माजी सचिव कै. एस. एन. पाटील यांच्याकडे थांबले होते. तेव्हापासून क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध खेडूत शिक्षण मंडळाबरोबर कायम राहिले आहे. आज ही तिसरी पिढी ही या विचाराची परंपरा पुढे चालवीत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. त्यामुळेच आमदार अरुण अण्णा लाड यांचे विशेष प्रेम खेडूत वर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, खजिनदार ए. व्ही. सुतार संस्थेचे मार्गदर्शक प्रा ॲड. एन. एस.पाटील, इंजिनीयर एम. एम. तुपारे, प्रसिध्द उद्योजक के. एस. माळवे, एस. व्ही. गुरबे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. ए. वाय. जाधव यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. ए. डी. कांबळे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment