जल जीवन मिशन ने नाही तर पावसानेच सोडवला पारगड चा पाणी प्रश्न...! शिव राज्याभिषेक दिन व पारगड हेरिटेज रन स्पर्धेवरील पाणी टंचाईचे सावट दूर - चंदगड लाईव्ह न्युज

29 May 2025

जल जीवन मिशन ने नाही तर पावसानेच सोडवला पारगड चा पाणी प्रश्न...! शिव राज्याभिषेक दिन व पारगड हेरिटेज रन स्पर्धेवरील पाणी टंचाईचे सावट दूर

 

पारगड किल्ल्यावरील मान्सून पूर्व पावसाने यंदा २० मे रोजीच तुडुंब भरलेला गणेश तलाव (फोटो- विठ्ठल शिंदे प्रोप्रा. हॉटेल गिरीदुर्ग किल्ले पारगड)

चंदगड : सी एल वृत्तसेवा

    नेहमीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यातच गडावरील सर्व तलाव विहिरी कोरड्या पडल्यामुळे हैराण झालेल्या किल्ले पारगड वासीयांचा पाणी प्रश्न अखेर यंदाही पावसानेच सोडवला. तोही दरवर्षीपेक्षा २५ दिवस आधी. परिणामी पाणीटंचाईमुळे हैराण झालेल्या  गडकरी तसेच गडावर रोज शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.

     गेल्या दहा वर्षात अनेक वेळा लक्षणिक उपोषण, आमरण उपोषण, धरणे, ठिय्या आंदोलने करून दमलेल्या चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले पारगड वरील मावळ्यांच्या पदरी पाण्याच्या बाबतीत अजूनही निराशाच पडलेली आहे. दोन तीन वर्षांपूर्वीपासून मंजूर झालेले जलजीवन मिशन अंतर्गत काम अजूनही कुर्मगतीने सुरूच आहे. सुरुवातीची दोन वर्षे पाण्याच्या स्रोत शोधण्यातच निघून गेली. अखेर मिरवेल हद्दीतून पाणी आणण्याचे निश्चित  झाल्यानंतर कामाला सुरुवात झाली असली तरी सातत्य व गतिमानतेच्या अभावामुळे यंदाच्या पाणीटंचाई पूर्वी  पाणी येईल ही अशा फोल ठरली.

   शिवकाळापासून गडावर असलेल्या ४ तलाव १८ विहिरींपैकी सद्यस्थितीत गणेश, गुंजन व फाटक असे तीन तलाव व तीन-चार विहिरी वापरात आहेत. पर्यटकांची वाढती संख्या व पाण्याचा वाढता वापर यामुळे पूर्वी वर्षभर पुरणारे पाणी फेब्रुवारी अखेरपर्यंतच संपून जात होते.  गडावरील पाणी संपल्यास ३ किमी वरून गडाच्या २५० पायऱ्या उतरून-चढून पाणी आणणे कुणालाही शक्य नव्हते. परिणामी पावसाळा सुरू होईपर्यंत इथल्या नागरिकांना अन्यत्र स्थलांतरित होणे हाच पर्याय होता.  यंदा तरी नळपाणी योजना पूर्ण होऊन गड सोडावा लागणार नाही ही आशाही फोल ठरली. दरम्यान गेल्या महिन्यात ठेकेदार गडावर पाणी आणण्यात यशस्वी झाल्यामुळे गावातील अंतर्गत पाईपलाईन होईपर्यंत योजनेचे पाणी कोरड्या तलावात आणून सोडावे अशी मागणी नागरिकांनी केली होती. पण ती पूर्ण होऊ शकली नाही. अखेर यंदाचा पाणी प्रश्न मान्सून पूर्व अवकाळी पावसानेच सोडवला. नेहमीपेक्षा सुमारे १ महिना आधीच तलाव पाण्याने ओसंडून वाहू लागल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाई पासून दिलासा मिळाला असला तरी जल जीवन मिशनची कामे केव्हा पूर्ण होणार हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.


*शिवराज्याभिषेक दिनापूर्वी तलाव विहिरी तुडुंब भरल्याने समाधान*

    मजरे कार्वे येथील शहीद जवान फाउंडेशन व जिल्ह्यातील शिवप्रेमींच्या वतीने दरवर्षी ६ जून रोजी गडावर होणाऱ्या राज्याभिषेक दिन उत्सवावेळी शिवप्रेमींना पाणी टंचाईचा फटका बसत होता. यामुळे येताना सोबत पाण्याचे टँकर घेऊनच त्यांना यावे लागे. तीच आवस्था १९ फेब्रुवारी रोजीच्या शिवजयंती उत्सवाच्या वेळीही होती. मात्र यंदाच्या अवकाळी पावसामुळे राज्याभिषेक दिनापूर्वीच पारगड वरील पाणी प्रश्न सुटला आहे. त्याचबरोबर ५ जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यंदा ८ जून रोजी होणाऱ्या 'स्टाफ इंडिया पारगड हेरिटेज रन' निमित्त देशभरातून गडावर येणाऱ्या हजारो धावपटूंची पाण्याअभावी होणारी हेळसांड थांबणार असल्याने दोन्ही कार्यक्रमाच्या आयोजकांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment