अडकुर येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार विचार मंचावर मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील व मान्यवर
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गेली ७० वर्षे कन्नड सक्तीच्या वरवंट्यामुळे त्रस्त झालेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या मराठी बहुभाषिक सीमा भागातील सुमारे एक कोटी पेक्षा अधिक मराठा बांधवांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याने काहीसा दिलासा मिळाला असून महाराष्ट्रात सामील होण्याच्या अशा उंचावल्या आहेत.
चंदगडचे माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या वतीने अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री झाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार चंदगड मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नुकताच आयोजित करण्यात आला होता. अडकुर (ता. चंदगड) येथे झालेल्या या मेळावा प्रसंगी भाषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले महाराष्ट्राला कधीच संघर्ष केल्याशिवाय काही मिळालेलं नाही मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले आहे. कर्नाटक सीमा भाग महाराष्ट्रात यावा म्हणून सुद्धा अनेक हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले आहे. ह्या प्रश्नावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुरुवातीस हा भाग महाराष्ट्राचाच भाग होता. तथापि तो भाषिक सलगता व लोक भावनेचा विचार न करता कर्नाटकात डांबण्यात आलेला आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असलेल्या या प्रश्नासाठी नामवंत वकिलांची फौज उभे करून मराठी बांधवांना लवकरच महाराष्ट्रात आणू. असा विश्वास व्यक्त करताना सीमा भागातील बांधवांनी आमच्यावर विश्वास ठेवावा, असे प्रतिपादन केले. चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांचा सीमा प्रश्नाबाबत महाराष्ट्र शासनाकडे नेहमी पाठपुरावा सुरू असतो. याचा धागा पकडून महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेतृत्व शुभम शेळके व अन्य नेते यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पवार यांनी सीमा भागावर आपलाच हक्क असल्याचे ठासून सांगितले. यामुळे कर्नाटक सीमा भागात राहणाऱ्या मराठी बांधवांच्या महाराष्ट्रात सामील होण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्याचे चित्र दिसत आहे.
सीमा भागातील मराठी मुला मुलींना महाराष्ट्रात नोकरी व शिक्षणात राखीव जागा ठेवण्यात आल्या असून बेळगाव परिसरातील मराठी बांधवांना उपयोगी होतील अशा शिक्षण व औद्योगिक संस्था नजीकच्या चंदगड आजरा, गडहिंग्लज, कागल परिसरात सुरू केल्या आहेत व नवीन साठी मोठा निधी देत आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
एकंदरीत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामुळे राजेश पाटील यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र- कर्नाटक सीमा लढ्यातील कार्यकर्तेही पुन्हा चार्ज झाले आहेत. असे म्हणावे लागेल.
No comments:
Post a Comment