फाटकवाडी धरण गतवर्षी पेक्षा २० दिवस आधीच ओव्हरफ्लो, चंदगड पश्चिम भागात पावसाचा जोर कायम - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2025

फाटकवाडी धरण गतवर्षी पेक्षा २० दिवस आधीच ओव्हरफ्लो, चंदगड पश्चिम भागात पावसाचा जोर कायम

  

यंदा पहिल्याच पावसात ओसंडून वाहणाऱ्या चंदगड तालुक्यातील फाटकवाडी मध्यम प्रकल्पाचे विहंगम दृश्य.

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

   कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या चंदगड तालुक्यात सुरू असलेल्या संतत धार पावसामुळे तालुक्यातील ताम्रपर्णी व घटप्रभा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर गेल्या २-३ दिवसात कमी असला तरी पश्चिम भागात तो कायम आहे. परिणामी काल दि. १७ जून २०२५ रोजी घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण ओव्हरफ्लो झाले.

    आठ दिवस सुरू असलेल्या पावसामुळे ठिक- ठिकाणचे ओढे, नाले, तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. काल संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील जांबरे, जंगमहट्टी, फाटकवाडी प्रकल्पांच्या पाणी पातळीत वाढ झाली. यातील घटप्रभा नदीवर असलेला फाटकवाडी मध्यम प्रकल्प यंदा १७ जून रोजी ओव्हर फ्लो झाला. गतवर्षी पेक्षा २० दिवस आधीच धरण तुडूंब भरले गतवर्षी ७ जुलै रोजी धरण पूर्ण भरले होते. गतवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रात प्रथम भरण्याचा मान फाटकवाडी धरणाने कायम राखायला आहे. 

  चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील गावांना वरदान असलेला हा प्रकल्प नेहमीच पहिल्याच पावसात भरतो. मान्सूनपूर्व पावसाने यंदा २० मे पासूनच हजेरी लावल्यामुळे मे अखेरीसच धरणात ५० टक्के पेक्षा अधिक साठा झाला होता. या प्रकल्पामुळे चंदगड तालुक्यातील २८ गडहिंग्लज तालुक्यातील १४ गावातील शेकडो हेक्टर शेतजमिनीला आणि बऱ्याच गावच्या पिण्या्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. याबरोबरच या प्रकल्पातील पाण्यावर दररोज ८ मेगावँट वीजनिर्मितीही केली जाते. प्रकल्प पूर्ण भरल्यानंतर सांडव्यातून मोठ्या उंचीवरुन पडणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकही या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावतात.  

  नद्या नाले दुथडी भरून वाहत असल्याने सध्या चंदगड तालुक्यातील खेकडे पकडणारी रस्सामंडळी कार्यरत झाली आहेत. तर तालुक्यातील कोवाड अडकुर चंदगड अशा साप्ताहिक बाजारातही खेकडे विक्री जोरात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

No comments:

Post a Comment