गडहिंग्लज : सी एल वृत्तसेवा
शासनाच्या धोरणानुसार जिल्हा परिषद शाळा उत्कृष्ट व चांगल्या पद्धतीने कायमस्वरूपी सुरू राहाव्यात असे शासनाचे नेहमीचे धोरण आहे.
जि. प. शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी विविध उपक्रम व सूचना शासनाकडून वेळोवेळी दिल्या जातात. तथापि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण घटत चालले आहे. ही बाब योग्य नाही. आपल्या गावातील शाळा टिकणे ती चांगल्या पद्धतीने चालू राखणे ही बाब आपल्या गावच्या लौकिकास व आपल्या सर्वांच्या दृष्टीने भूषणावह आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील पटसंख्या वाढावी यासाठी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी विविध उपक्रमांबद्दल ठराव केले आहेत. ग्रामपंचायतींनी गावातील जिल्हा परिषद शाळेतील पहिलीच्या वर्गात विद्यार्थ्याचे नाव दाखल केल्यास त्या पालकांची घरपट्टी पाणीपट्टी माफ करण्याचे धोरण जाहीर केले आहे. तर काही सरपंचांनी पुढे येऊन स्वतःच्या मानधनातून अशा पालकांची पाणीपट्टी माफ करण्याची तसेच या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा बहाल करण्याची घोषणा केली आहे. याही पुढे जाऊन पंचायत समिती गडहिंग्लजचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी खास परिपत्रक काढून जिल्हा परिषद शाळेच्या इयत्ता पहिलीच्या वर्गात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या नावे असणाऱ्या एका निवासी मिळकतीचा एक वर्षाचा घरफाळा माफ करणे बाबतची कार्यवाही ग्रामसभा ठराव घेऊन आपले स्तरावर करण्यात यावी. असे आवाहन पंचायत समिती गडहिंग्लज अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना केले आहे. याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पंचायत समितीकडे तात्काळ सादर करावा असे आदेश देण्यात आले आहेत. या उपक्रमाला ग्रामपंचायत प्रशासनाचे कितपत सहकार्य व निर्णयाची अंमलबजावणी होते हे पहाणे रंजक ठरेल.
चंदगड तालुक्यातही नुकतेच इब्राहिमपूर ग्रामपंचायतीने अशा प्रकारच्या ठराव घालून पालकांना आपल्या मुलांना जिल्हा परिषद प्रवेश घेण्यासंदर्भात कौतुकास्पद पाऊल टाकले आहे. एकंदरीत अलीकडच्या काळात खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा भुलभुलय्या तर काही पालक अज्ञानामुळे खाजगी शाळांकडे वळले आहेत. यांना पुढचे धोके माहीत नसावेत. आपली हक्काची सरकारी शाळा टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून त्या दृष्टीने सर्वांनी आपले सहकार्य ठेवले पाहिजे. त्यासाठी प्रथम आपल्या मुलांना जि. प. शाळेत प्रवेश घेणे ही पहिली पायरी आहे.
No comments:
Post a Comment