'बांधकाम' च्या अजब कारभाराचा प्रवासी, वाहनधारकांना फटका, तिलारीनगर येथे पर्यायी रस्ता वाहून गेल्याने दोडामार्ग कडील वाहतूकिचा बोजवारा - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2025

'बांधकाम' च्या अजब कारभाराचा प्रवासी, वाहनधारकांना फटका, तिलारीनगर येथे पर्यायी रस्ता वाहून गेल्याने दोडामार्ग कडील वाहतूकिचा बोजवारा

 

तिलारीनगर येथे पुलाचे काम वेळेत पूर्ण न केल्याने पर्यायी रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी सुरू होता. अति पावसाने हा रस्ता वाहून गेल्याने दलदलीत दुचाकी व चारचाकी वाहने अडकून पडत आहेत. येथे  पलटी झालेला टेम्पो.

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    यंदा काहीशा अचानक सुरू झालेल्या मान्सूनपूर्व व मान्सून पावसाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे धिंडवडे काढले आहेत. काम पूर्ण होणार नाही हे माहीत असूनही पावसाळ्याच्या तोंडावर सुरू  केलेली कामे अर्धवट पडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग अक्षरशः तोंडावर पडल्याचे चित्र ठिक ठिकाणी दिसत आहे. 

      आधीचा रस्ता सुस्थितीत असतानाही रस्ता नवीन करण्या साठी  चंदगड हिंडगाव इब्राहिमपूर रस्ता मे महिन्यात उकरून टाकला तथापि तो पूर्ण होऊ न शकल्याने पावसामुळे येथे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्याची फळे रस्त्यावरून जाणारे वाहनधारक व प्रवासी भोगत आहेत. अशीच गत आता तिलारी नगर येथील पावसाळ्याच्या तोंडावर सुरू केलेल्या मोरीच्या बांधकामाची झाली आहे. या बांधकामासाठी पर्यायी काढलेला रस्ता सततच्या पावसामुळे काल वाहून गेला.  येथून जाणारा कोंबड्या वाहतूक करणारा टेम्पो उलटला, तर अनेक वाहने खड्डे व चिखलात अडकून पडली, एसटी वाहतूक ठप्प झाली परिणामी प्रवासी व वाहनधारकांना याचा चांगलाच फटका बसला आहे. 

      सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी चंदगड, तिलारीनगर, कोदाळी, तिलारी घाट, दोडामार्ग ते गोवा मार्गावर तिलारी नगर येथे सुस्थितीत असलेली मोरी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मे महिन्यात जमीनदोस्त करून नवीन मोरीचे बांधकाम ठेकेदार मार्फत सुरू केले. या कामासाठी तयार केलेला पर्यायी रस्ता सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसात पूर्णपणे वाहून गेल्याने येथे चिखल, खड्डे व पडलेल्या मोठ मोठ्या चरी यामुळे वाहने चालवणे अशक्य बनले आहे. सोमवार दि. १६ रोजी सकाळी पणजी कोल्हापूर दोडामार्ग कोल्हापूर या गाड्या येथून सुखरूप निघून गेल्या त्यानंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने हा पर्यायी रस्ता वाहून गेला येथून गाडी घालण्याच्या प्रयत्नात कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो  दलदलीत पलटी झाला. अनेक दुचाकी व चार चाकी चिखलात रुतून बसल्या या खेचून बाहेर काढण्यासाठी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. तर नंतर येणाऱ्या एसटी बस बंद करण्यात आल्या.

      नेसरी, नागनवाडी, चंदगड, हेरे, मोटनवाडी,  तिलारीनगर, कोदाळी या रस्त्याचे काम गेली तीन-चार वर्षे सुरू होते. हा रस्ता गतवर्षीच पूर्ण झालेला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण सुरू असतानाच ही मोरी का बांधली नाही? असा संतप्त सवाल ग्रामस्थ व नागरिकांनी केला असून याला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर शासनाने कारवाई करावी. अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ व वाहनधारकांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment