कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
घरात सकाळची कामे उरकण्यात मग्न असलेल्या बक्कीहाळ खुर्द, (ता. चंदगड) येथील अर्जुन बंडू बिर्जे यांच्या कुटुंबीयांना अचानक घरात शिरलेला साप दिसला. सापाला पाहताच सर्वांची एकच घारभरगुंडी उडाली घाबरगुंडी उडाली. यावेळी प्रसंगावधान राखून गावातील कोणीतरी ढोलगरवाडी सर्पोद्यान चे सर्पमित्र संदीप टक्केकर यांना घटनेची खबर दिली. आपल्या शालेय कामात व्यस्त असलेले संदीप यांनी तात्काळ बुक्कीहाळ येथे जायची तयारी केली. आपल्या कामानिमित्त शाळेत आलेले ढोलगरवाडी येथील नागरिक शिवाजी पाटील यांनाही सोबत घेत १० किमी अंतरावरील बुक्कीहाळ खुर्द गाव गाठले. निघताना त्यांनी साप लपलेल्या ठिकाणी नजर ठेवण्यास सांगितले होते. बिर्जे यांच्या घरची मंडळी व शेजारी साप गेलेल्या ठिकाणी नजर ठेवून होते.
संदीप टक्केकर यांनी अडगळीत लपलेला काळा कभिन्न नाग साप शिताफिने पकडला. चंदगड तालुक्यात आढळणाऱ्या नाग सापांमध्ये हा सा प अधिकच काळा दिसत होता. सुमारे पाच ते सहा फूट लांबीच्या या खतरनाक विषारी सापाला सर्पमित्र टक्केकर यांनी पकडून बाहेर आणले. यावेळी घरातील सदस्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. टक्केकर यांनी यावेळी उपस्थित सर्वांना सापाविषयी माहिती देऊन त्यांच्यातील भीती दूर केली. शेवटी ह्या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
एकीकडे ढोलगरवाडी, ता चंदगड येथील सर्प शाळेच्या माध्यमातून सुरू असलेले सर्प प्रबोधनाचे केंद्र व त्यातून पर्यावरणातील पर्यावरण संतुलनातील सर्वोच्च घटक असलेल्या सापांना मिळणारे जीवदान दुर्लक्षित करून हे केंद्रच बंद करावे यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय विभाग तसेच वन व पर्यावरण मंत्रालय टपून बसला आहे. दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक व गोवा राज्याला उपयुक्त असलेल्या ढोलगरवाडी येथील आद्य सर्पमित्र कै बाबुराव टक्केकर यांनी सुरू केलेल्या सर्पोद्यानची व्याप्ती वाढवण्यासाठी या केंद्राला लागणारी पुरेशी जमीन, शासकीय निधीतून सुविधा पुरवाव्यात अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment