बसर्गे शाळेतील चिमुकल्यांनी घेतला चिखलात ' भातरोप लावणीचा' अनुभव - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2025

बसर्गे शाळेतील चिमुकल्यांनी घेतला चिखलात ' भातरोप लावणीचा' अनुभव

 

बसर्गे शाळेतील विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे शेतात भातरोप लावण्याचा अनुभव घेतला. 

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
   सध्याच्या डिजिटल युगात शालेय विद्यार्थ्यांचे शेतीशी नाते तुटत चालले आहे. ही नाळ जोडण्याच्या उद्देशाने मराठी विद्या मंदिर बसर्गे (ता. चंदगड) शाळेतील उपक्रमशील अध्यापक शाहू पाटील यांनी पाठ्यपुस्तकातील 'धूळपेरणी' या कवितेच्या अध्यापनाच्या अनुषंगाने शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात नेऊन शेतकरी बांधवांसोबत चिखलात रोप लावणीचा अनुभव दिला. 
शेतात जाताना पानंद रस्त्यातील गुडघाभर चिखलाचा अनुभव वेगळाच ठरला

    शेतकऱ्यांच्या वाट्याला येणारे खडतर श्रम,  शेतीच्या पेरणीपूर्व मशागत पासून पेरणी, पिकातील अंतर मशागत कापणी पासून आपल्या ताटात भाकरी तयार होऊन येईपर्यंत काय काय यातना कराव्या लागतात याची विद्यार्थ्यांना बालवयातच जाणीव व्हावी. आपल्याला वर्षभर लागणारे अन्नधान्य शेतीतून उत्पादन करून आपल्याला जगवणारा बळीराजा अर्थात शेतकऱ्यांबद्दल अभिमान व आपलेपणा वाटावा, विद्यार्थ्यांच्या अंगी श्रम प्रतिष्ठा निर्माण व्हावी. या उद्देशाने राबवलेल्या या उपक्रमाचा हेतू अशाप्रकारे साध्य झाला. असेच म्हणावे लागेल. 
  शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने भाग घेऊन थोडा वेळ का होईना भात रोप लावणीचा आनंद लुटला. शेतात जाताना लागणारी चिखलाची वाट व शेतातील चिखलातील प्रत्यक्ष रोप लावणी याचा विद्यार्थ्यांना आलेला अनुभव ते आयुष्यभर विसरणार नाहीत.

No comments:

Post a Comment