शक्तीपीठ विरोधात लढा तीव्र करणार, चंदगडला सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्धार - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2025

शक्तीपीठ विरोधात लढा तीव्र करणार, चंदगडला सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्धार

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

       शक्तीपीठ महामार्ग विरोधात लढा तीव्र करण्याचा निर्णय आज हलकर्णी येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेश पाटील होते.

      सुरवातीला माजी आमदार श्री. पाटील यांनी स्वागत करून हा शक्तीपीठ महामार्ग हा चंदगड गडहिंग्लच्या जनतेच्या फायद्याचा नसून इथल्या शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा आहे. आपण सर्वांनी याची नीट माहिती आणि लोकांचे प्रबोधन करून शक्तीपीठ विरोधात एकसंघपणे लढा उभा करूया. एकजुटीची ही वज्रमुठ अशीच भक्कम ठेवण्याचे आवाहन केले. 

       शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक कॉम्रेड संपत देसाई म्हणाले की ``१२ जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठ महामार्ग विरोधात लढत आहेत. सगळीकडे टोकदार विरोध असताना चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मात्र शक्तीपीठची मागणी करीत आहेत. खरंतर विकासच करायचा असेल तर अनेक मुद्दे आहेत. हा भाग मागास नाही तर हा भाग पुढारलेला आहे. राज्याच्या कुठल्याही भागापेक्षा हा भाग शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेला आहे. त्यामुळं विकासासाठी कोण शक्तीपीठ आणतो म्हणत असेल तर ते साफ खोटं आहे.``

       संग्राम कुपेकर म्हणाले की ``आम्ही राजकीय विरोधक म्हणून एकत्र आलो नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र आलो आहोत. या महामार्गामुळे शेतजरी उध्वस्त होणार असल्याने आम्ही लढणारी माणसे एकत्र आलो आहोत.``

    शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यान्रावर म्हणाले की ``हा रस्ता केवळ अदानीची खनिजे गोव्याला नेण्यासाठीच केला जात आहेत. विकास बिकास या सगळ्या गोष्टी थापा आहेत. त्यामुळं शेतकरी आणि इथला निसर्ग वाचवण्यासाठी आम्ही या लढ्यात आहोत.``

      प्रा सुनील शिंत्रे म्हणाले की ``राज्यात सगळीकडे विरोध असताना चंदगडचे आमदार मंगणी करतात हे न समजणारे आहे. याला सर्व शक्तींनी विरोध करू.``

      गोपाळराव पाटील म्हणाले की ``आपण सर्व माहिती घेऊ आणि गावोगावी बाधित शेतकऱ्यांच्या सभा बैठका घेऊन प्रबोधन करूया त्यासाठी सगळे मिळून लढा करू.``

   यावेळी ड. संतोष मळविकर, रियाज शमनजी यांनीही आपली भूमिका मांडली. यावेळी विद्याधर गुरबे, अमर चव्हाण, अभय देसाई अडकूरकर, कॉ. संजय तरडेकर, सुभाष देसाई, तात्यासाहेब देसाई, भिकाजी गावडे, तानाजी गडकरी, सुभाष देसाई, एम. जे. पाटील, भरमाना गावडे, जयवंतराव सरदेसाई, शेखर गावडे, संतोष मोरे, अमृत जत्ती, पांडुरंग बेनके, गोविंददादा पाटील, विष्णू गावडे, शरद मथकर, दिलीप वाके, मनोहर गावडे, विवेक मनगुटकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment