चंदगड : सी एल वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) गावात जोतिबा बागिलगेकर हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर उभा राहतो एक सच्चा कार्यकर्ता, साधेपणाचा, कष्टाचा आणि निष्ठेचा जिवंत प्रत्यय. दि. १६ जुलै २०२५ त्यांच्या दुःखद निधनाने कोवाड गावच नव्हे तर सर्व परिसर शोकमग्न झाला.
सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला हा माणूस. सुरुवातीला टेलर व्यवसाय करीत आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत राहिला. काबाडकष्ट, प्रामाणिकपणा आणि कष्टाला धरून ठेवलेली निष्ठा, हाच त्याचा खरा ठेवा होता. राजकारणात तंटामुक्त अध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा प्रवास कुणाही सामान्य माणसाला आदर्श वाटावा असा होता.
गावातल्या मुख्य बाजारपेठेत पावती काढण्यापासून ते गावाच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदापर्यंत, त्यांनी नेहमीच आपल्यातला साधेपणा जपला. पदाचा कधीही गर्व केला नाही, ना प्रसिद्धीची हाव धरली. लोकांच्या मनात त्यांनी आपली जागा प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कष्टाने मिळवली होती. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची आजारपणाशी झुंज सुरू होती. उपचारासाठी कोल्हापुरला गेले तरी गावकऱ्यांच्या आठवणी, त्यांच्या चिंता त्यांच्या मनातून कधीच दूर गेल्या नाहीत. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. आज कोवाड गावाने एक समाजसेवक गमावला.
त्यांच्या जाण्याने गावात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बाजारपेठेतील त्यांची हाक, पावती काढताना दिसणारा तो साधा चेहरा, कुणाच्याही कामाला नेहमी तत्पर असलेली ती व्यक्ती हे सगळं आता केवळ आठवणीत उरलं. गावकरी, मित्रमंडळी आणि आप्तेष्टांसाठी जोतिबा बागिलगेकर हे नाव केवळ व्यक्ती नव्हे, तर कष्ट, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्तीचं जिवंत उदाहरण होतं. जोतिबा बागिलगेकर यांच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो हीच प्रार्थना.
No comments:
Post a Comment