चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्याच्या पश्चिम टोकाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्याच्या सीमेवर ईसापुर, पारगड, नामखोल, मिरवेल ही चंदगड तालुक्यातील चार गावे तर दोडामार्ग तालुक्यातील तेरवण व पेंढारवाडी ही दोन गावे वसली आहेत. चंदगड या तालुक्याच्या ठिकाणापासून या गावांचे अंतर सरासरी ३० किलोमीटर आहे. अति पाऊस व डोंगराळ, अतिदुर्गम, जंगल परिसरातील या सर्व गावांतील ग्रामस्थांना गेली शेकडो वर्षी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
या सर्व गावांची मिळून एकत्रित लोकसंख्या २००० इतकी भरेल. तथापि या सर्व गावांना एकत्रित मिळून सद्यःस्थितीत एकही शासकीय आरोग्य सुविधा केंद्र उपलब्ध नाही. पंधरा वर्षांपूर्वी ईसापुर येथे या परिसरापासून २५ किलोमीटर अंतरावरील हेरे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र स्थापन करण्यात आले होते. या आरोग्यवर्धिनी केंद्रात स्थापनेनंतर दोन वर्षे एक आरोग्य सेविका कार्यरत होती. पण तिच्या बदलीनंतर एकही परिचारिका किंवा कर्मचारी या ठिकाणी देण्यात आलेला नाही. परिणामी आरोग्यवर्धिनी केंद्र समस्यांच्या गर्तेत, झाडे- झुडपे व घाणीच्या साम्राज्याने वेढले आहे.
जंगल परिसर असल्यामुळे येथे नेहमी सर्पदंश, वाघ, अस्वल, गवे, रानडुक्कर यांचा सुळसुळाट असल्यामुळे त्यांच्यापासून होणारे हल्ले येथील नागरिकांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. याशिवाय गरोदर महिला, बाळंतपणे, हार्ट अटॅक सारखे अचानक उद्भवणारे आजार या परिस्थितीत उपचारांची स्थिती रामभरोसेच आहे.
विज्ञान व वैद्यकीय शास्त्राने आपल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असली तरी देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षे पुर्तीनंतरही तालुक्यात ही स्थिती आहे. यात बदल होऊन ईसापूर केंद्राला कायमस्वरूपी डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांसह ॲम्ब्युलन्स व्यवस्था करावी. अशी मागणी पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार यांनी थेट मंत्रालयात जाऊन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री कोल्हापूर व सिंधुदुर्ग तसेच आमदार चंदगड व सावंतवाडी यांना पाठल्याचे शेलार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment