कुदनूर : सचिन तांदळे/ सी एल न्यूज
कुदनूर (ता. चंदगड) पासून ४ किमी अंतरावर असलेल्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील दिंडलकोप परिसरात सद्या सोयाबीन व बटाटा पीक जोमात आहे. तरारलेल्या पिकाने हा परिसर फुलून गेला आहे. या भागात जोंधळा, बाजरी, ऊस ही प्रमुख पीके असली तरी यंदा बटाटा पिकाला पोषक वातावरण आहे. गतवर्षी येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने हाता तोंडाला आलेले पीक वाया गेले. त्यामुळे येथील बळीराजा खूप चितेत होता. यंदा पाऊस बटाटे, सोयाबीनच्या पिकासाठी उपयुक्त ठरत आहे. बळीराजा सुखावला असला तरी किडीचा प्रादुर्भाव काही प्रमाणात दिसून येत आहे. सकाळी शेतकरी पाठीवर औषध फवारणी चे पंप घेऊन फिरत असल्याचे दिसत आहे.
उसावर मावा प्रमाणा वाढत आल्याचे दिसून येत आहे. सद्या या भागात शेतकरी बेळगांव येथे हमाली कामासाठी जात असल्याने मजूरांची कमतरता भासू लागली आहे. शेतात काही ठिकाणी कोळपणी केली जात आहे. तर रोपे लावण चालू आहे. येथील जोंधळा उत्तम प्रतीचा असून बाजारपेठेत त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. गणेश चतुर्थी नंतर दसरा सणाच्या आसपास बटाटा पिक काढणीस येत असल्याने सणासुदीच्या दिवसांमध्ये बटाट्याला चांगला दर मिळेल ही अपेक्षा येथील शेतकरी बाळगून आहेत.
No comments:
Post a Comment