निट्टूर येथील तंटामुक्त कमिटीचे माजी अध्यक्ष, निवृत्त कृषी अधिकारी एम आर पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2025

निट्टूर येथील तंटामुक्त कमिटीचे माजी अध्यक्ष, निवृत्त कृषी अधिकारी एम आर पाटील यांचे निधन

  


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

          निट्टूर (ता. चंदगड) येथील रहिवाशी, तंटामुक्त कमिटीचे माजी अध्यक्ष व सेवानिवृत्त कृषी अधिकारी मारुती रामचंद्र पाटील तथा एम आर पाटील (काका) वय ८४ वर्षे यांचे सोमवार दि. २१/०७/२०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित तीन चिरंजीव, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रवळनाथ हायस्कूल चंदगडचे शिक्षक आर, एम, पाटील, तुडीये विभागात कार्यरत असलेले पशुवैद्यकीय डॉ  नरसिंग पाटील व प्रगतशील शेतकरी बहिर्जी पाटील यांचे ते वडील होत. 

       पुणे येथे कृषी अधिकारी म्हणून असताना पासून ते माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जात. सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्यात सहभाग घेत त्यांनी निटूर येथे जय शिवराय विकास सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली. गावात शेतकरी दूध संस्था, आधार बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. गावातील तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही सर्वांना योग्य न्याय देण्याचे कार्य केले. दरवर्षी गुढीपाडव्याला गावात होणाऱ्या कुस्ती मैदानाला मैदानाच्या यशस्वीतेसाठी ते नेहमी अग्रेसर असत. गोरगरीब व गरजू लोकांना त्यांचा मदतीचा हात नेहमी पुढे असायचा, गावातील लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत ते सर्वांना आदराने वागवत. यामुळे गावात  ते आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात.  गावातील विविध क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कै बी एल पाटील व एम आर पाटील काका यांनी एकत्रित करून आधार बहुउद्देशीय सेवा संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा-बारा वर्षात गावात अनेक विधायक उपक्रम राबवले जातात. त्याचा लाभ गावातील विद्यार्थी व नागरिकांना होत आहे. सामाजिक कार्यात गेली ५० वर्षे अग्रेसर असलेल्या एम आर पाटील काकांच्या निधनामुळे गावच्या  सामाजिक चळवळीला धक्का बसला आहे. 

No comments:

Post a Comment