डोक्यावरील तब्बल ८ किलो वजनाची जटा उतरवली, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आजाऱ्यातील वृद्ध महिलेला दिलासा - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2025

डोक्यावरील तब्बल ८ किलो वजनाची जटा उतरवली, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आजाऱ्यातील वृद्ध महिलेला दिलासा

आजरा : सी. एल. वृत्तसेवा

       गांधीनगर आजरा येथील 70 वर्षे वयाच्या लक्ष्मीबाई अर्जुन नाईक या गरीब  वृद्ध महिलेच्या डोक्यावरील जटांचे ओझे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उतरवले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्यांच्या या उपक्रमामुळे वृद्ध लक्ष्मीबाईचे या पुढील जगणे सुसह्य होणार आहे.

        गेले काही महिने या वृद्ध महिलेने भीतीपोटी डोक्यावरून आंघोळ ही केली नव्हती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सामाजिक कार्यकर्त्या गीता पोतदार यांनी तिला अनेक वेळा हे ओझे काढण्याबद्दल विनंती केली होती. तथापि देवीचा कोप होईल या अंधश्रद्धेपोटी प्रत्येक वेळी लक्ष्मीबाई त्यांना टाळत होती.  तिचा वृद्ध नवरा इचलकरंजी येथील आपल्या मुलीकडे राहतो. शरीराची योग्य स्वच्छता नसल्याने विविध व्याधींनी महिलेचे जेणे मुश्किल झाले होते. तथापि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तिला एक प्रकारे नवजीवन दिले आहे.

      'देवीवर श्रध्दा असली तरी वयाचा विचार करून डोक्यावरील हा जटांचा भार कमी करून मला मान दुखी व अन्य त्रासातून मुक्त करा' असे अखेर लक्ष्मीबाई यांनी पोतदार यांना सांगितले. लक्ष्मीबाई च्या होकाराने उत्साहीत झालेल्या महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या जिल्हा प्रतिनिधी पोतदार यानी आजरा तालुका कार्याध्यक्ष काशिनाथ मोरे, तालुका सचिव संजय घाटगे, तालुका उपाध्यक्ष भिकाजी कांबळे, हाळोली शाळेच्या शिक्षिका सुरेखा नाईक याच्या मदतीने लक्ष्मीबाईच्या डोक्यावरची तब्बल ८ किलो वजनाची जट उतरवून तिला या जो खडा तून मुक्त केले.

No comments:

Post a Comment