चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
"शाळा ही विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा केंद्रबिंदू असली, तरी घर हे पहिलं शाळा असते. शिक्षक केवळ 6 तास शिकवतात, पण उर्वरित वेळ पालकांनी संवादातून, सहभागातून आणि सहकार्यातून विद्यार्थ्याला अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. विद्यार्थी चारित्र्यवान घडविणे हेच खरे शिक्षण!" असे मत बी. सी. एस. महाविद्यालयाचे प्राचार्य एस. पी. पाटील यांनी व्यक्त केले.
दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. एस. चौगुले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक आर. पी. पाटील यांच्या स्वागताने झाली. यावेळी उपमुख्याध्यापक व्ही. एन. कांबळे म्हणाले, "विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या सवयी, नियोजनशक्ती आणि भावनिक समज विकसित होण्यासाठी शिक्षकासोबतच पालकांचेही मार्गदर्शन महत्त्वाचे असते."
शिष्यवृत्ती मार्गदर्शिका वर्षा पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "शिष्यवृत्ती परीक्षा ही फक्त आर्थिक लाभासाठी नसून विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेचा कस पाहणारी संधी आहे. इयत्ता पाचवीत चांगली कामगिरी करणारा विद्यार्थी NMMS, NTSE व स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चितच उजळून निघतो."
या वेळी पालकांशी अभ्यासक्रम, सरावपत्रिका, मासिक चाचण्या, गट चर्चा, शंका निरसन, मोबाईल वापरावर नियंत्रण, टीव्हीच्या मर्यादा, घरच्या अभ्यासाचे नियोजन यासंबंधी सविस्तर चर्चा झाली.
या मेळाव्याला जान्हवी पाटील, कविता काजिर्णेकर, मच्छिंद्र पाटील, किशोर गावडे, शरद हदगल, ओंकार पाटील, प्रियाराणी बुरुड, साधना भोसले, नामदेव गोंधळी आदी मान्यवर, पालक आणि शिक्षक उपस्थित होते. सुत्रसंचालन संजय साबळे यांनी केले. आभार प्रदर्शन व्ही. के. गावडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment