अण्णाभाऊंच्या लेखणीची ताकद संयुक्त महाराष्ट्रासाठी कारणीभूत - प्रशांत मगदूम, बागिलगे डुक्करवाडी विद्यालयात पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2025

अण्णाभाऊंच्या लेखणीची ताकद संयुक्त महाराष्ट्रासाठी कारणीभूत - प्रशांत मगदूम, बागिलगे डुक्करवाडी विद्यालयात पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        बागिलगे (ता. चंदगड) "केवळ दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीच्या आणि आवाजाच्या ताकदीने समाजप्रबोधन करत संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी जनजागृती केली. त्यांच्या साहित्याने समाजपरिवर्तनाची दिशा दिली," असे प्रतिपादन प्रशांत मगदूम यांनी केले. ते येथील डुक्करवाडी विद्यालयात अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

    कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक टी. व्ही. पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर एम. एन. शिवणगेकर यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.

        प्रशांत मगदूम आपल्या भाषणात म्हणाले की, "अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीद्वारे जनतेच्या वेदना, आशा‑आकांक्षा आणि असंतोष यांचे वास्तव चित्रण केले. ‘माझी मैना गावाकडं राहिली’ हे गीत केवळ एका कामगाराच्या पत्नीची वेदना नाही, तर सीमाभागातील – बेळगाव, कारवार यांसारख्या मराठी भाषिक प्रदेशातील लोकांच्या ताटातुटीचं प्रतिनिधित्व करतं."

        त्यांनी पुढे सांगितले की, "शाहीर अमर शेख, शाहीर साबळे आणि अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्र पिंजून काढत केवळ राजकीय नव्हे तर सांस्कृतिक पातळीवर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती घडवून आणली. आपणही या थोर साहित्यिकांकडून प्रेरणा घेत आपली अभिव्यक्ती समाजपरिवर्तनासाठी वापरली पाहिजे." कार्यक्रमाच्या शेवटी संस्कृतीकमंत्री श्रद्धा राऊत यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment