'शिवचातुर्य दिनानिमित्त' आग्रा किल्ल्यावर १७ ऑगस्ट रोजी गोवा येथील १०० महिला कलाकारांचे 'शिवगाथा' हे ऐतिहासिक महानाट्य, चंदगड तालुक्यातील मावळे सहभागी - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2025

'शिवचातुर्य दिनानिमित्त' आग्रा किल्ल्यावर १७ ऑगस्ट रोजी गोवा येथील १०० महिला कलाकारांचे 'शिवगाथा' हे ऐतिहासिक महानाट्य, चंदगड तालुक्यातील मावळे सहभागी

  


कालकुंद्री : श्रीकांत पाटील / सी. एल. वृत्तसेवा 

       १७ ऑगस्ट १६६६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाच्या नजर कैदेतून त्याच्या हातावर तुरी देत बुद्धी  चातुर्याने आपली सुटका करवून घेतली. मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारा हा प्रसंग. औरंगजेबाच्या मगर मिठीतून निसटने केवळ अशक्य तथापि छत्रपतींनी ते शक्य करून दाखवले. व तत्कालीन राजधानी राजगड ला सुखरूप पोहोचले. या अविश्वसनीय घटनेची जगभरातील तत्कालीन इतिहासकारांनी दखल घेतली.

       या घटनेच्या स्मरणार्थ गेल्या पाच वर्षांपासून पुणे येथील गरुडझेप संस्थेच्या वतीने १७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या १४ दिवसांच्या कालावधीत आग्रा ते राजगड हा १३१० किलोमीटर मार्ग शिवज्योत घेऊन पायी दौड मोहीम आखली जाते. या मोहिमेत गरुड झेप संस्थेचे गोवा प्रदेश अध्यक्ष शिवश्री राजाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी युवक युवती सहभागी होतात. यंदा या मोहिमेंतर्गत प्रथमच 'कला शक्ती डान्स इन्स्टिट्यूट, कुठ्ठाळी- गोवा' या संस्थेच्या मराठमोळ्या १०० महिला मावळ्यांचा सहभाग असलेले शिवचरित्र व शिवरायांच्या शौर्य गाथेवर आधारित 'शिवगाथा' हे ऐतिहासिक महानाट्य सादर केले जाणार आहे. या महानाट्यात शंभर महिला कलाकार सहभागी होणार असून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ विविध मराठा सरदार, मावळे, मुघल सरदार, सैनिक, औरंगजेब, अफजलखान अशा सर्व भूमिका महिला कलाकार साकारणार आहेत. हे महानाट्य औरंगजेबाची तत्कालीन राजधानी आग्रा किल्ल्याच्या समोर उभारण्यात  येणाऱ्या भव्य रंगमंचावर  १७ ऑगस्ट २०२५ रोजी सादर केले जाणार आहे. 

      क्रूर व कपटी औरंगजेबाने शिवरायांना आग्रा येथे भेटीला बोलावून दगलबाजीने त्यांना नजरकैदेत टाकले. तथापि महाप्रतापी शिवरायांनी तब्बल ९९ दिवसानंतर   १७ ऑगस्ट १६६६ रोजी सुटका करून घेत राजगडाच्या दिशेने गरुड झेप घेतली. या अजरामर व सुवर्णाक्षरांनी नोंद झालेल्या सर्व घटनांचा 'शिवगाथा' या महानाट्यात ऊहापोह केला आहे.

  शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सरसेनापती पिलाजी गोळे यांनी आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगात मोलाचे योगदान दिले होते. त्यांचे थेट तेरावे वंशज ॲड. मारुती उर्फ आबा गोळे यांनी या घटनेच्या स्मरणार्थ तसेच 'मधुमेह मुक्त भारत' हा संदेश घेऊन आग्रा ते राजगड असा १३१० किलोमीटर पायी दौड मोहिम आखली आहे. 

  आग्रा येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी १३ ऑगस्ट २०२५ रोजी  कुठ्ठाळी व सांकवाळ- गोवा परिसरातील १०० महिला अन्य मावळ्यांचे गोवा ते आग्रा रेल्वेने प्रस्थान होणार आहे. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे,  गोव्याचे अनेक मंत्री व आमदार यांच्यासह गरुड झेप संस्था व कलाशक्ती डान्स इन्स्टिट्यूट चे सदस्य उपस्थित राहणार आहेत. तर आग्रा येथील कार्यक्रमास उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री योगेंद्र  उपाध्याय यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी दोन्ही कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे गोवा प्रदेशाध्यक्ष सांकवाळ- गोवा येथील रहिवाशी राजाराम शिवाजी पाटील (मुळगाव ढोलगरवाडी ता. चंदगड) यांनी केले आहे. या मोहिमेत चंदगड तालुक्यातून उमगावचे उपसरपंच पुंडलिक तळकटकर, गोपाळ कांबळे (उमगाव), दीपक गावडे (न्हावेली) आदी सहभागी होणार आहेत.



आग्रा ते राजगड दौड मार्गावरील गावे 


आग्रा, धोलपूर, ग्वालियर, मोहाना, शिवपुरी, भद्रवास गुना, बिगवणी, पाचोर, देवास, टेकरी, शेंदवा, मालेगाव, चांदवड, सिन्नर, संगमनेर, भोसरी, नारायणगाव, खेडशिवापुर, नरसापुर, साखर व रायगड



फोटो 

शिवगाथा महानाट्याची रंगीत तालीम प्रसंगी नाटकातील महिला कलाकार 


उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय यांना निमंत्रण देताना गरुड झेप संस्थेचे पदाधिकारी

No comments:

Post a Comment