१९५० पूर्वीचे महसूलचे पुरावे मिळावेत या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीचे चंदगड तहसील समोर आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

03 September 2025

१९५० पूर्वीचे महसूलचे पुरावे मिळावेत या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीचे चंदगड तहसील समोर आंदोलन

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा

   चंदगड तालुक्यातील २२ गावांमधे १९५० पूर्वीचे महसूलचे पुरावे न मिळाल्यामुळे जात प्रमाणपत्र मिळण्यास स्थानिक लोकांना त्रास होत आहे. १९५० पूर्वीचे महसूलचे पुरावे कुरुंदवाड येथे होते. २००५ च्या पुरामध्ये ते वाहून गेले किंवा खराब झाले. या जुन्या कागदपत्रांची योग्य ती काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य होते तथापि शासन व प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ही सर्व जुने कागदपत्रे  खराब झाले  आता मात्र सरकारी अधिकारी आम्हाला १९५० पूर्वीच्या महसूल चे पुरावे हवे अन्यथा आम्ही तुम्हाला जात प्रमाणपत्र देऊ शकत नाही असे सांगत आहेत. निश्चितच हा तेथील स्थानिक लोकांवरती अन्याय आहे. सरकारने यावर काहीतरी तोडगा काढून ही अट शिथिल करावी. कारण ग्रामपंचायतींची स्थापना १९५८ नंतरची आहे.‌ तर ज्या गावांना ही समस्या  आहे येथील नागरिकांकडून १९६०  पूर्वीचे महसूलचे पुरावे मागण्यात यावेत किंवा या अटींमध्ये सवलत द्यावी जेणेकरून लोकांना त्यांच्या मूलभूत अधिकाराचा उपभोग घेता येईल. 

       या विषयाच्या अनुषंगाने आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने चंदगड तहसीलच्या आवारात एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांसोबत शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय दिसत होती.  आंदोलनाचे नेतृत्व बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने प्रकाश नाग यांनी केले. यावेळी अमित सुळेकर, विनायक खांडेकर, राजू पुंडलिक कांबळे, ज्योतिबा सुतार, नितीन सुतार, राहुल मोरे, नितीन राऊत, शरद पाटील  आदींसह सुरूते, कागणी, तुडये, गवसे, निट्टूर, म्हाळुंगे, सातवणे, बुजवडे, मजरे कार्वे, खालसा गुडवळे, देवरवाडी आधी गावांतून कार्यकर्ते उपस्थित होते. 

    या आंदोलनानंतर प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक करण्याचे आश्वासन दिले असल्याचे आंदोलकांनी सांगितले.


No comments:

Post a Comment