श्री गणेशा आरोग्याचा उपक्रमांतर्गत ठिकठिकाणी झालेल्या शिबिरात उपस्थित वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी रुग्ण व त्यांचे नातेवाईक
चंदगड : सी एल वृत्तसेवा
सध्याच्या धकाधकीच्या युगात इच्छा असूनही बरेच आजारी व व्याधीग्रस्त रुग्ण रोगमुक्त होण्यासाठी डॉक्टर पर्यंत जाऊन पोहोचू शकत नाहीत. किंबहुना यातील बरेच रुग्ण सुरुवातीला किरकोळ दिसणाऱ्या आजाराकडे दुर्लक्ष करत आजार अंगावर काढतात. त्या किरकोळ आजाराचे नंतर मोठ्या व्याधीमध्ये रूपांतर होते. एका गोळीने बरे होणाऱ्या आजारासाठी नंतर हजारो रुपयांच्या नाहक खर्चाबरोबरच अनेक दिवस अंथरुणावर पडावे लागते. या सर्वांचा त्रास नंतर कुटुंबातील सर्व सदस्य व नातेवाईकांना होतो. अशा व सर्वसामान्य रुग्णांसाठी आरोग्य विभागाने गणेश चतुर्थीचे औचित्य साधून श्री गणेशा आरोग्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाची ग्रामीण रुग्णालय चंदगड मार्फत नियोजनबद्ध अंमलबजावणी सुरू आहे. गेल्या तीन चार दिवसात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे. बी. मकानदार यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड शहर व परिसरातील गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. यात श्री साई गणेशोत्सव मंडळ, उत्कर्ष राजा गणेशोत्सव मंडळ, श्री रवळनाथ गणेशोत्सव मंडळ, चंद्रसेन गल्ली गणेशोत्सव मंडळ आदी ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. परिसरात अजूनही विविध ठिकाणी अशा प्रकारची शिबिरे आयोजन करण्यात येणार आहेत. या शिबिरांना नागरिक व विविध प्रकारच्या रुग्णांचा उदंड प्रतिसाद पाहता ही शिबिरे महाआरोग्य शिबिरेच ठरली आहेत. अशी माहिती डॉ. योगेश पवार यांनी दिली.
शिबिरातून मोफत नेत्र तपासणी, रक्त तपासणी, सर्वसामान्य आजार यावर मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले. रुग्णसेवेबरोबरच आधार कार्ड, गोल्डन कार्ड काढण्यात आली. तसेच अवयव दान विषयी प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य शिबिरे यशस्वी करण्यासाठी डॉ. मकानदार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ योगेश पोवार, डॉ पल्लवी निंबाळकर, डॉ देवराज सुतार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिगंबरे, परिचारिका पुजारी, ॲम्बुलन्स चालक संतोष पाटील, आशा सेविका व सर्व आरोग्य कर्मचारी पथकाने परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment