चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध - चंदगड लाईव्ह न्युज

22 September 2025

चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध

  


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

        त्र्यंबकेश्वर- नाशिक येथे टोल वसुली करणाऱ्या गुंडांकडून पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाने तीव्र निषेध केला आहे. या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 

       नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा बैठकीच्या वृत्तांतनासाठी त्र्यंबकेश्वर येथे गेलेले पुढारी न्युज चे प्रतिनिधी किरण ताजणे, झी न्यूजचे योगेश खरे व साम टीव्ही चे अभिजीत सोनवणे यांना तेथील पार्किंग माफियांच्या गुंडांनी  जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. खारघर मुंबई येथील अनिल शुक्ल नावाच्या व्यक्तीने ए एस मल्टीसर्विसेस कंपनीच्या माध्यमातून पार्किंगचा ठेका घेतला असून वसुलीसाठी गुंडांचे टोळके ठेवले आहे. ते दिवसभर पर्यटक व भाविकांकडून पठाणी पद्धतीने पार्किंगचे पैसे वसूल करतात. या गुंडांनी तिघा पत्रकारांवर जीवघेणा हल्ला करून त्यांना जखमी केले. घटनेतील पाच गुंडांना पोलिसांनी अटक केली असून काही जण फरार आहेत. त्यांच्याही पोलीस प्रशासनाने तात्काळ मुसक्या आवळून कठोर शिक्षा द्यावी. अशी मागणी चंदगड पत्रकार संघाने  केली असून पत्रकार हल्ला प्रतिबंधक कायदा केवळ कागदावर नको त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी अशी मागणी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केली आहे. यावेळी उपाध्यक्ष संतोष सावंत- भोसले, खजिनदार संपत पाटील, सचिव चेतन शेरेगार, डिजिटल मीडिया राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धूपदाळे आदींसह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment