माडखोलकर महाविद्यालयात मार्गदर्शन करताना ॲड. अमृता शेरेगार
चंदगड / सी. एल. वृतसेवा
“आजच्या युगात महिलांनी केवळ शिक्षण घेऊन थांबू नये, तर स्वतःच्या हक्कांविषयी सजग राहून आत्मविश्वासाने पुढे जाणे आवश्यक आहे. महिला सक्षम झाल्यास कुटुंब सक्षम होते आणि त्यातून समाज प्रगत होतो,” असे प्रतिपादन ॲड. अमृता शेरेगार यांनी केले. त्या चंदगड येथील र.भा त बोलत होत्या.
महाविद्यालयाच्या महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ॲडव्होकेट शेरेगार यांनी आपल्या व्याख्यानात महिलांचे हक्क, संरक्षण न्याय, तक्रारी नोंदविण्याची प्रक्रिया, तसेच सायबर मीडियावरील पोस्टसंदर्भातील कायदेशीर तरतुदी व महिला विषयक कायद्यांवर सविस्तर विवेचन केले. “महिला तक्रार निवारण समित्या विद्यार्थिनींसाठी आधारस्तंभ आहेत. छेडछाड, अन्याय किंवा अत्याचाराविरुद्ध महिलांनी आवाज उठवावा व कायद्याच्या तरतुदींचा योग्य उपयोग करावा. आत्मविश्वास, शिक्षण आणि सजगता या त्रिसूत्रीच्या जोरावरच महिलांना खऱ्या अर्थाने सशक्त होता येईल,” असे त्या म्हणाल्या.
प्रास्ताविक करताना समितीच्या प्रमुख डॉ. रंजना कमलाकर म्हणाल्या की, “महिलांनी केवळ तक्रारी करण्यापुरते मर्यादित न राहता स्वतःला सक्षम बनवणे गरजेचे आहे. शिक्षण, आत्मविश्वास आणि हक्कांची जाणीव ही महिलांच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल म्हणाले, “महिला तक्रार निवारण समित्यांच्या माध्यमातून मुलींना सुरक्षित वातावरण मिळते. महिलांनी शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. आत्मविश्वासाने कोणत्याही अडचणींवर मात करता येते, याची जाणीव विद्यार्थिनींनी ठेवावी.”
प्रा. मयुरी कांडर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर आभारप्रदर्शन डॉ. एस. डी. गावडे यांनी मानले.
या व्याख्यानास डॉ.के. एन निकम, प्रा. एल. एन. गायकवाड, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. एस. एन. पाटील, प्रा. एस. एम. पाटील, शिवराज हासुरे, अनिल पाटील, नंदकुमार चांदेकर, प्रा. पूजा देशपांडे, प्रा. राहुल पाटील, प्रा. हांडे, सौ. जरीना सय्यद यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment