पारगड किल्ल्यावर पर्यटकांची मनमानी, वन विभागाने बंदोबस्त ठेवावा...! ग्रामस्थांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2025

पारगड किल्ल्यावर पर्यटकांची मनमानी, वन विभागाने बंदोबस्त ठेवावा...! ग्रामस्थांची मागणी

  

पारगड किल्ल्यावर चढून जाण्यासाठी असलेल्या शिवकालीन ऐतिहासिक पायऱ्या 

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

      चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक पारगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या सध्या कमलीची वाढली आहे. रस्ते नव्हते त्या काळात महिनाभर लागून शे पाचशे पर्यटक किल्ल्याला भेट द्यायचे, तेवढे आत्ता रोज येऊ लागले आहेत. पण पूर्वीचे सर्व पर्यटक शिवप्रेमी शिवभक्त असायचे. पण सध्या  हुल्लडबाजी, चंगळवादी संस्कृतीत वाढलेल्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.  अशा अनुचित प्रकार करणाऱ्या पर्यटकांना काही सांगायला गेल्यास उलट ते स्थानिक ग्रामस्थांना दमदाटी करताना दिसत आहेत. यांच्या उपद्रवामुळे येथील ग्रामस्थ हैराण झाले असून त्यांनी वन विभाग व पोलीस खात्याने येथे बंदोबस्त ठेवावा अशी मागणी केली आहे. 

       सन १६७४ म्हणजे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी  या किल्ल्याची उभारणी केली.  किल्ल्याचा पहिला किल्लेदार म्हणून सुभेदार तानाजी मालुसरे पुत्र रायबा यांना किल्लेदारी बहाल करून सोबत पाचशे मावळे दिमतीला देत 'चंद्र, सूर्य असेपर्यंत गड राखा..!' असा आदेश दिला. तो येथील मावळे आजही प्राणपणाने जपत आहेत किंवा जपला आहे. मराठेशाहीत त्यानंतर इंग्रज व पोर्तुगीज काळातही परकियांची आक्रमणे परतावून लावत मावळ्यांनी किल्ला अजिंक्य ठेवला. असा या किल्ल्याला देदीप्यमान इतिहास आहे. 

        परंतु आता शिवभक्त मावळ्यांसोबत समाजकंटक प्रवृत्तीच्या पर्यटकांचा गडावर  शिरकाव होत असल्याने ती येथील  लढाऊ मावळ्यांच्या मोजक्या संख्येने शिल्लक राहिलेल्या वंशजांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गडाचे पावित्र्य भंग होणार नाही अशी कृत्ये करू नका असे सांगायला गेले तरी उद्धट पर्यटक उलट ग्रामस्थांना दमदाटी करताना दिसत आहेत. याचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा गडाचे अस्तित्वच धोक्यात यायला वेळ लागणार नाही. 

          पंधरा वर्षांपूर्वी हा किल्ला साडेतीनशे वर्षे या किल्ल्यावर पिढ्यान  पिढ्या राहणाऱ्या मावळ्यांच्या विरोध डावलून सन १९७२  मध्ये अस्तित्वात आलेल्या वन विभागाने ताब्यात घेतला आहे. परिणामी गडाच्या जतन, संवर्धन व रक्षणाची जबाबदारी वन विभागावर जाते. तथापि या विभागाचे कोणतेच लक्ष या किल्ल्याकडे दिसत नाही. त्यामुळे गडावरील ऐतिहासिक वास्तू व ठेव्यांची नासधूस करण्या बरोबरच भवानी मंदिरातील दानपेटी व गाभारा फोडून मूर्तीच्या अंगावरील दागिने पळवण्याचे धाडस चोरट्यांनी मागील महिन्यात केले नसते.  एकंदरीत आपले उत्तरदायित्व ओळखून वन विभागाने किमान दोन शिपाई या ठिकाणी तैनात करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, वन हक्क व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष रघुवीर शेलार यांच्यासह विठ्ठल राघोबा शिंदे, प्रकाश चिरमुरे, धोंडीबा बेर्डे, देविदास गडकरी, संभाजी जांभळे, बाळू जांभळे आदी ग्रामस्थांनी केली आहे.

No comments:

Post a Comment