
मांडेदुर्ग येथील खडीमशीन कायमस्वरूपी हद्दपार कराव्या या मागणीचे निवेदन देण्यासाठी चंदगड येथे शेकडोंच्या संख्येने एकवटलेले मांडेदुर्ग महिला ग्रामस्थ
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा दि. ३०-१२-२०२५
चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या एका खडीमशीनचे दगड फोडण्यासाठी सुरू असलेल्या जिलेटिन स्फोटामुळे गाव व परिसरात भूकंप सदृश्य हादरे बसत आहेत. यामुळे गावातील शाळा, घरे, शौचालय यांच्या भिंतीना तळे जात असून प्रदूषणामुळे गावातील लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. खडीमशीन च्या उपद्रवामुळे ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून या उद्रेकातूनच ग्रामस्थांनी चंदगड येथे मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदनाद्वारे आपले गाऱ्हाणे मांडले.
मांडेदुर्ग गावच्या हद्दीत सुंडी गावालगत तसेच कडगावकर शेत डोंगराकडे खडी मशिन (क्रशर) सुरु आहे. त्यास गावसभेत तीव्र विरोध करण्यात आलेला आहे. याबाबतचे निवेदन दिनांक ३१/०१/२०२५ रोजी तहसील कार्यालयात सादर करण्यात आले आहे. तरीसुद्धा गावकऱ्यांचा विरोध डावलून सदर क्रशर मशिन राजरोसपणे सुरु आहेत. या क्रशर मशिनद्वारे जवळजवळ १०० फूट क्षमतेचे मोठ्या प्रमाणावर जिलेटीन ब्लास्टिंग करण्यात येत आहे. दिनांक २६/१२/२०२५ रोजी सकाळी ९:१५ वाजता खाणींमध्ये तीव्र स्फोट घडवून आणल्याने खालील गंभीर घटना घडल्या आहेत :
१) गावातील अनेक घरांना मोठमोठे तडे गेले असून खिडक्यांची तावदाने फुटली आहेत.
२) गावातील काही जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.
३) कै. सुंदराबाई शिवाजी पवार यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे.
४) अनेक घरांतील टीव्ही व घरगुती उपकरणे व साहित्याचे नुकसान झाले आहे.
५) रोजगार हमी योजनेतून बांधलेल्या विहिरींना तडे गेले आहेत.
६) जलजीवन मिशन अंतर्गत बांधलेली पाण्याची टाकी लिकेज झाली आहे.
७) सुमारे २०० बायोगॅस प्रकल्पांना भेगा पडून ते निकामी झाले आहेत.
८) तसेच या क्रशर मशिनच्या ५० टन क्षमतेच्या मालवाहू गाड्या रात्रंदिवस गावातून धावतात, त्यामुळे प्रचंड प्रमाणात धूळ उडून दम्याचे, श्वसनाचे व इतर आजार वाढले आहेत. रात्रीच्या वेळी होणाऱ्या प्रचंड आवाजामुळे गावकऱ्यांची झोपमोड होऊन मानसिक तणाव वाढत आहे.
९) मराठी शाळेजवळून गाड्यांची ये-जा होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर व आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत आहे.
१०) शेतकऱ्यांनी कर्ज काढून, आयुष्याची पुंजी लावून उभारलेली घरे अक्षरशः डोळ्यादेखत भेंगाळत आहेत.
११) क्रशर मशिनजवळच पाणलोट क्षेत्रातील सुमारे १५ लाख रुपये खर्चून बांधलेले नाला बंधारे लिकेज होण्याच्या मार्गावर आहेत.
१२) परिसरात वनक्षेत्र असल्यामुळे वन्यप्राणी त्रस्त होऊन ते गावामध्ये येत आहेत. शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत.
१३) धुळीमुळे भात, नाचणी, काजू व जनावरांच्या चाऱ्याचेही नुकसान झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी खडी भरून येणारे डंपर अडवले असता, क्रशर मालकाने ग्रामपंचायत व तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून धमकावले आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून मांडेदुर्ग गावच्या मुळावर आलेल्या या खडी मशिन तात्काळ कायमस्वरूपी बंद कराव्यात. नुकसानग्रस्त मालमत्तेचे पंचनामे करून योग्य भरपाई देण्यात यावी. तसेच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावर कारवाई न झाल्यास दिनांक ५ जानेवारी २०२६ पासून तहसील कार्यालय, चंदगड येथे साखळी उपोषण सुरु करण्यात येईल. तसेच येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. चंदगड येथे निवेदन देत असताना गावातील शेकडो आबालवृद्ध उपस्थित होते.
No comments:
Post a Comment