राजर्षी शाहू विकास आघाडीला यश; काँग्रेसने ६ पैकी ४ जागांवर मिळवला विजय, “लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभार करा” — सतेज पाटील यांचे नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन
चंदगड / सी. एल. वृत्तसेवाचंदगड नगरपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नवनियुक्त नगरसेवकांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार नेते सतेज (बंटी) पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी आमदार सतेज पाटील यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले तसेच पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
चंदगड नगरपंचायत निवडणूक ही राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने लढवली होती. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला उल्लेखनीय यश मिळाले असून एकूण सहा जागांपैकी चार जागांवर विजय मिळवत पक्षाचा स्ट्राइक रेट लक्षणीय ठरला आहे. या निवडणुकीत सुधीर पिळणकर, सुधा गुरबे, नविद अत्तार व जयश्री वणकुंद्रे हे चार नगरसेवक विजयी झाले आहेत.
या भेटीदरम्यान आमदार सतेज पाटील यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधत चंदगड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी संघभावनेने काम करण्याचे आवाहन केले. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे लोकाभिमुख निर्णय घ्यावेत, पारदर्शक प्रशासन राबवावे आणि नगरपंचायतीच्या माध्यमातून शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा व नागरी समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. चंदगड नगरपंचायतीत विकासाभिमुख आणि लोकहिताच्या कारभारासाठी राजर्षी शाहू विकास आघाडी सज्ज असल्याचा विश्वास या भेटीतून व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील, तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई–शिरोलीकर, काँग्रेस नेते विक्रम चव्हाण–पाटील, राजेंद्र परिट, अभिजीत गुरबे, संतोष वणकुंद्रे, तसेच सुभाष गावडे, मजिद अत्तार, महेश वणकुंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment