वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान रोका, नुकसान भरपाई त्वरित द्या - संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांचे वन खात्याला निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2025

वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान रोका, नुकसान भरपाई त्वरित द्या - संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांचे वन खात्याला निवेदन

 

चंदगड : वन्यप्राण्यांबाबत विविध समस्या दूर व्हाव्यात म्हणून सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे, वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड यांच्याकडे निवेदन देत असताना लक्ष्मण गावडे.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

     चंदगड व पाटणे वनपरिक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या शिवारात वन्यप्राण्यांचे अतिक्रमण होत असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहेत नुकसान होणाऱ्या पिकांचा त्वरित पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी तसेच चंदगड शहराजवळ तसेच बिजूर भौगोलिक झामरे या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी चंदगड येथील संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांनी वनखात्याकडे केली आहे.

     चंदगड येथे लक्ष्मण गावडे यांच्या कार्यालयाला कोल्हापूर वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे व चंदगड वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड यांनी भेट दिली. यावेळी लक्ष्मण गावडे यांनी सदर निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली. 

     यावेळी लक्ष्मण गावडे म्हणाले, वन्य प्राण्यांचे अतिक्रमण रोखण्यासाठी  राज्य शासनाच्या माध्यमातून वन खात्याला पूर्णपणे सहकार्य केले जाईल. आमदार शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही समस्या सांगू. मात्र नक्की नुकसान भरपाईची प्रक्रिया त्वरित पूर्ण करत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

      देसाईवाडी येथे बिबट्याच्या आगमनानंतर चंदगड शहर उपनगरात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करावी. शिवारात गवीरेडे, रानडुक्कर, वनगाई यांच्याकडून पिकांचे नुकसान सुरू आहे. 

     निवेदनात म्हटले आहे की, आठ दिवसापासून चंदगड शहराजवळ बिबट्याचा वावर आहे. तसेच चंदगड वनकार्यक्षेत्रामध्ये पट्टेरी वाघ, बिबट्या अशा प्राण्यांचे दिवसाढवळ्या दर्शन होत आहे. शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.  अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्या कडून हल्ला होत आहे. या प्रकाराची त्वरित दखल घेऊन वन्यप्राण्यांना त्यांच्या मूळ अधिवासात परतवून लावावे.

No comments:

Post a Comment